वीजेअभावी ठाण्यातील ५ आपला दवाखाना बंद

दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने ठिकठिकाणी आपला दवाखाना सुरु केले मात्र शहरातील पाच दवाखान्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संकल्पनेची नक्कल करण्याच्या प्रयत्नात, ठाणे महापालिका प्रशासनाची अक्कल यानिमित्ताने उघड्यावर पडली असून, मोठा गाजावाजा करीत सुरु केलेल्या आपला दवाखाना अक्षरशः अंधारात चाचपडताना दिसत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ठाणे महापालिका प्रशासनाने, या दवाखान्यांच्या वीजबिलंच भरली नसल्याने दवाखाना चालवायचा कसा? असा पेच संबंधित संस्थेसमोर उभा ठाकला आहे. शिवाय डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर खर्च भागविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. वीजबिल न भरल्यामुळे शहरातील पाच दवाखान्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यावरुन, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच दिव्याखाली अंधार असल्याचे उघड झालं आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील किसननगर, आनंदनगर, वसंत विहार, फुलगल्ली, भीमनगर या भागांतील दवाखान्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी, येत्या काळात हे दवाखाने बंद पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकाराला महापालिका आणि संबंधित लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत असून, आरोग्य सेवेसारख्या मुलभूत सुविधेकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित व्यक्तींची चौकशी करुन, त्यांच्यावर ठोस कायदेशीर कारवाई करण्यासोबतच, वीजपुरवठा खंडित केलेल्या दवाखान्यांचा वीजपुरवठा सुरळीत करावा आणि सर्व ४२ दवाखाने सुस्थितीत आणि नियमितपणे सुरु ठेवण्यात यावेत, अशी आग्रही मागणी धर्मराज्य पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर धर्मराज्य पक्षाच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, आणि ठाणे महापालिकाआयुक्तांना पत्रव्यवहार करुन, आपला दवाखाना अंधारात ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कठोर-कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading