गोखले रस्त्यावरील दोन वेळा चोरीला गेलेला बस थांबा पुन्हा जागेवर

नौपाड्यातील ए. के. जोशी शाळेजवळ उभारलेला टीएमटीचा बस स्टॉप चक्क दोन वेळा चोरीला गेला असल्याचे उघड झाले. या प्रकारासंदर्भात नगरसेवक संजय वाघुले यांनी पाठपुरावा केल्यानंतर पुन्हा बसस्टॉप बसविण्यात आला आहे. या चोरीमागे बसस्टॉपमागील दुकानदारांचा हात असल्याची शक्यता टीएमटी प्रशासनाने पोलिसांकडे व्यक्त केली आहे. टीएमटीचा अनेक वर्षांपासून ए. के. जोशी शाळेजवळ थांबा आहे. मात्र, सर्वप्रथम २८ जुलै रोजी हा थांबा गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर नौपाडा पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. या गंभीर प्रकाराची दखल नगरसेवक संजय वाघुले यांनी घेतली. नगरसेवक अशोक वैती यांनीही तक्रार केली. वाघुले यांनी तातडीने परिवहन समितीच्या सभापतींना पत्र पाठवून थांबा पुन्हा बसविण्याची मागणी केली होती. त्यानंतर या ठिकाणी स्टिल मटेरियलचा बस थांबा बसविण्यात आला होता. मात्र तो १८ ऑगस्टनंतर पुन्हा चोरीला गेला होता. अखेर वाघुले यांच्या पाठपुराव्यानंतर टीएमटीने पुन्हा एकदा ए. के. जोशी शाळेजवळ बस थांबा लावला आहे. नौपाड्यातील मोक्याच्या जागांवर असलेल्या दुकानांना बस स्टॉपचा अडथळा होतो. त्यामुळे बस स्टॉप हटविण्यासाठी काही दुकानदार प्रयत्न करतात. मात्र ए. के. जोशी शाळेजवळचा बस स्टॉप दोन वेळा चोरण्याचा प्रकार धक्कादायक आहे. या प्रकाराची चौकशी करून परिसरातील सीसीटीव्हीद्वारे बस स्टॉप चोरण्याच्या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी संजय वाघुले यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading