गणपती अन् डॉ.बाबासाहेबांचे आक्षेपार्ह चित्र पोस्ट करणार्‍यावर गुन्हा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शरीर आणि गणपतीचे शिर अशा पद्धतीचे छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करुन ते व्हायरल करणार्‍यावर वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोस्टमुळे आंबेडकरी तसेच गणेशभक्तांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला गणपतीचा मुखवटा लावलेले चित्र जनार्दन केशव-आवाम यांच्या वॉलवर पोस्ट करण्यात आले होते. सर्वांनाच गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, मूर्तिकाराच्या कल्पकतेचे आणि कार्यकर्त्यांच्या संकल्पनेचे कौतूक, फारच आनंदी चित्र, बुद्धीदाता विनायक सर्वांनाच सुबुद्धी देवो, हीच गणराया चरणी विनम्र प्रार्थना,” असा संदेश लिहून सदर पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने अनेकांनी ही पोस्ट डिलीट करण्याची विनंती जनार्दन केशव- आवाम याच्या वॉलवर केली होती. मात्र, त्याने ही पोस्ट डिलीट न केल्यामुळे शास्त्री नगर येथे राहणारे उमेश इंदिसे यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.या संदर्भात उमेश इंदिसे यांनी सांगितले की, जनार्दन केशव- आवाम याच्या या फेसबुक पोस्टमुळे गणपती आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या दोघांचेही विद्रुपीकरण झाले आहे. किंवा असे विद्रुपीकरण करणार्‍यांचे समर्थन करुन जनार्दन केशव-आवाम याने हिंदू आणि बौद्ध या दोन धर्मांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या कृत्यामुळे सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही तेढ निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन सदर इसमावर कारवाई व्हावी, यासाठीच आपण ही तक्रार दाखल केली असल्याचे उमेश इंदिसे यांनी सांगितले. तर, या प्रकरणी राजाभाऊ चव्हाण यांनीदेखील नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading