क्वारंटाइन सेंटरमधील रहिवाशांची गैरसोय खपवून घेणार नाही – पालकमंत्री

कोरोना विरोधातील मुकाबल्यात आपण सर्वच एकदिलाने काम करत आहोत. कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या संशयित व्यक्तींच्या विलगीकरणासाठी क्वारंटाइन सेंटर्सही मोठ्या प्रमाणात सुरू केली आहेत. मात्र या ठिकाणी दाखल केलेल्यांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची काळजी महापालिकेने घ्यायची आहे. याबाबतच्या तक्रारी खपवून घेणार नाही अशी सक्त ताकीद पालकमंत्र्यांनी दिली. महापालिका अधिकाऱ्यांसमवेत घोडबंदर रोड येथील होरायझन स्कूलमधील क्वारंटाइन केंद्राला त्यांनी भेट दिली त्यावेळी त्यांनी ही ताकीद दिली. कोरोना विरोधातील लढाईत पालकमंत्री स्वत: रस्त्यावर उतरून प्रशासकीय यंत्रणेचे नेतृत्व करत असून अधिकारी- कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी त्यांनी स्वत: पीपीई किट घालून जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड वॉर्डात जाऊन कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधला होता. शिंदे यांच्या या एका कृतीमुळे प्रशासकीय यंत्रणा तसेच कोरोनाबाधित रुग्णांमध्येही नवी उमेद निर्माण होऊन कोरोना विरोधातील लढाई अधिक तीव्र झाली आहे. कोव्हिड रुग्णालये आणि क्वारंटाइन सेंटर येथील रुग्ण आणि संशयितांना उत्तम आहार मिळणे, तेथील बेड, गाद्या, उश्या, चादरी यांची व्यवस्था, औषधे आणि स्वच्छता साहित्याची उपलब्धता, रुग्णवाहिकांची उपलब्धता यावर पालकमंत्री सातत्याने लक्ष ठेवून आहेत. क्वारंटाइन केंद्रात विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या जेवणाची त्यांनी आज पाहणी केली. त्यानंतर ध्वनीक्षेपकाद्वारे त्यांनी तेथे विलगीकरण करण्यात आलेल्यांशी संवाद साधून त्यांना भेडसावत असलेल्या अडचणींची माहिती घेतली. विलगीकरण केलेल्या नागरिकांची जबाबदारी पालिकेची असून कुठलाही त्रास जाणवू नये यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नशील आहे. काहीही अडचण जाणवत असल्यास नि:संकोच सांगा असे शिंदे यांनी केले. पालकमंत्र्यांनी स्वत: संवाद साधल्यामुळे येथील रहिवाशांनीही समाधान व्यक्त केले. यावेळी रहिवाशांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर शिंदे यांनी जेवण आणि औषधांबाबतच्या तक्रारी तातडीने दूर करण्याचे निर्देश महापालिका अधिकाऱ्यांना दिले. क्वारंटाइन सेंटरमध्ये अतिजोखमीचे संशयित रुग्ण ठेवण्यात येत असून त्यांची कुठलीही आबाळ होता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या सुनील केदार या शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पत्नीला न्यूमोनिया झाल्यामुळे अन्य एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कुटुंबियांची काळजी वाटत असल्याचे शिंदे यांना सांगितले. त्यावर त्यांनी तात्काळ संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांशी दूरध्वनीवरून चर्चा करून केदार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि उपचारात काहीही कमी पडू न देण्याच्या सूचना केल्या. होरायझन येथील क्वारंटाइन सेंटरच्या पाहणीनंतर त्यांनी तीन हात नाका येथील गुरुद्वारा येथे शीख बांधवांच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या कम्युनिटी किचनचीही पाहणी केली. या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून शीख बांधव करत असलेल्या मदतीबद्दल शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading