क्लस्टर योजनेत ठाणे महानगरपालिका आणि महाप्रीत यांच्यात सामान्य निर्णायक करारावर स्वाक्षऱ्या

आशिया खंडातील सर्वात मोठी, महत्वाकांक्षी आणि ऐतिहासिक समूह विकास योजना (क्ल्स्टर) ठाण्यात मूर्त रुप घेत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्प्यातील काम किसननगरमध्ये सुरू झाले आहे. त्याच टप्प्यातील टेकडी बंगला, हाजुरी आणि किसननगर क्लस्टरचा काही भाग विकसित करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने महात्मा फुले नुतनीय उर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लिमिटेड (महाप्रीत) या शासकीय संस्थेसह करार केला.
ठाणे महानगरपालिका आणि महाप्रीत या दोन संस्थांमधील सामान्य निर्णायक करारावर (General Definitive Agreement) महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि महाप्रीतचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी सह्या केल्या. महानगरपालिका क्षेत्रातील मुलभुत सुविधांचा अभाव असलेल्या भागाचा तसेच धोकादायक आणि जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी अशा क्षेत्रात नागरी पुनरुत्थान योजना (क्लस्टर) राबविण्यासाठीची नियमावली एकत्रिकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. त्या नियमानुसार ठाणे महानगरपालिकेकडून आतापर्यंत एकूण ४५ नागरी पुनरुत्थान आराखडे अधिसूचित करण्यात आलेले आहेत. अधिसूचित एकूण ४५ क्लस्टरपैकी सहा क्लस्टरबाबतची अंमलबजावणी प्राधान्याने करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यात, कोपरी, राबोडी, किसननगर, लोकमान्यनगर, हाजुरी, टेकडी बंगला यांचा समावेश आहे. अनेक वर्षे नागरिक प्रतीक्षा करीत असलेल्या क्लस्टर योजनेचा प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्याने आणि त्याची अंमलबजावणी कालबद्ध पध्दतीने पूर्ण होणार असल्याने अधिकृत आणि मालकी हक्काच्या घरात राहण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. अनधिकृत इमारतीसह वसाहतीचा टाऊनशीप धर्तीवर एकत्रित पुनर्विकासाचा प्रकल्प, मोडकळीस आलेल्या घरातून थेट सुरक्षित आणि सुनियोजित संकुलामध्ये घर, पात्र निवासी लाभधारकास विनामूल्य ३२३ चौ. फूट मालकी हक्काचे घर, प्रत्येक सेक्टरमध्ये सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रमांसाठी विशेष जागा, प्रत्येक सेक्टरमध्ये वाचनालय, व्यायामशाळा, आरोग्यकेंद्र आणि कम्युनिटी सेंटरची व्यवस्था, पाळणाघरासह महिला सक्षमीकरण केंद्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, अरुंद रस्ते आणि गजबजलेल्या गल्लीऐवजी प्रशस्त आणि दर्जेदार रस्ते आणि वाहतूक सुविधा, पाणीपुरवठा, मल आणि जलनिःस्सारण, घनकचरा व्यवस्थापनासह पायाभूत सुविधा, पुनर्विकसित टाऊनशीप आराखड्यामध्ये सुसज्ज आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, उद्यान पार्किंग, मंडई आदि नागरी सुविधांचा समावेश या योजनेत आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading