कोविड वॉर रूम पुन्हा कार्यरत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे नागरिकांनी दक्षता घ्यायची गरज असून रुग्णवाढीची टक्केवारी लक्षात घेता ठाणे महापालिकेतील कोविड वॉर रूम पुन्हा कार्यरत करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोना स्थितीच्या आढावा बैठकीत राज्य कोविड कृती दलाची निरीक्षणे, आरोग्य मंत्रालयाच्या सूचना, शहरातील खाजगी रुग्णालयातील कोविड उपचार, डॉक्टरांनी पाळावयाची मार्गदर्शक तत्वे यावर सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले.  चाचण्यांची संख्या वाढवणे, रुग्णसंख्येचा सतत आढावा घेणे, राज्य आणि देशातील इतर ठिकाणच्या रुग्ण संख्येवरही लक्ष ठेवावे, अशा प्रकारच्या सूचना आयुक्त  बांगर यांनी या बैठकीत दिल्या. कोविडसाठी महापालिकेने नेमलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांची आवश्यकतेनुसार कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, महापालिकेची आरोग्य केंद्रे येथे नेमणूक करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास तत्काळ पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटर सुरू करण्यासाठी या मनुष्यबळाचा वापर केला जाणार आहे. रुग्ण संख्या वाढत गेल्यास त्याच प्रमाणात खाटांची संख्या ही वाढवली जाईल. खाटांची कमतरता भासणार नाही यासाठी आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्यास सांगितले आहे. कोणाचीही उपचाराअभावी गैरसोय होणार नाही. वॉर रूम च्या माध्यमातून रुग्ण सेवेचे नियोजन केले जाईल, असेही आयुक्त बांगर यांनी सांगितले. कोविड संशयित, कोविडबाधित आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनी, लिव्हर, मज्जातंतू यांचे विकार या सहव्याधी असलेले रुग्ण यांची माहिती देण्यासाठी या व्हॉट्सॲप ग्रुपचा वापर केला जाईल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. चाचणी, विलगीकरण, उपचार या त्रिसूत्रीचे कायम पालन केले जावे, त्यामुळे आपल्याला कोरोनाचा प्रसार रोखता येईल. नागरिकांनी, कुटुंबात सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकिय सल्ला घ्यावा. त्यात हयगय केल्यास ते जीवावर बेतू शकते, याचे भान नागरिकांनी अवश्य बाळगावे, असेही आयुक्त  बांगर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading