कोरोना विरोधातील युद्धात कुठल्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही – एकनाथ शिंदेंचा इशारा

कोरोना विरोधातील युद्धात कुठल्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही असा इशारा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आज महापालिकेत आयोजित सर्वपक्षीय बैठकीत महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. करोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूदर खाली आणण्याची गरज असतानाच कोरोनाविरोधातील युद्धात कुठल्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही असे सांगून कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला. फायली तयार करण्यात वेळ घालवू नका. कागदी घोडे नाचवण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. कोरोनाबाधित रुग्णांवर वेळच्यावेळी उपचार होणे महत्त्वाचे आहे. परंतु अनेक ठिकाणी वेळच्या वेळी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याच्या असंख्य तक्रारी येत असून त्याची गंभीर दखल घेत तातडीने १० रुग्णवाहिका कंत्राटी पद्धतीने दाखल करून घेण्याचे आदेश त्यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांना दिले. तसेच, बाधित रुग्णांवर उपचार करत असतानाच काँटॅक्ट ट्रेसिंग आणि तपासण्यांकडे जराही दुर्लक्ष होता कामा नये असेही सांगितले. फीवर ओपीडी मोबाइल दवाखान्यांची संख्या वाढवा, मृत्यूदर कमी करण्यासाठी वैद्यकीय पूर्वेतिहास असलेल्या वरिष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी वैद्यकीय तपासणी शिबिरांचे आयोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले. शहरातील अनेक खासगी रुग्णालये कोव्हिड रुग्णालये म्हणून महापालिकेने घोषित केली असून या ठिकाणी बाधित रुग्णांना दाखल करून उपचार केले जात आहेत. मात्र, या रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात असल्याच्याही असंख्य तक्रारी प्राप्त होत असून त्याबाबतही शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. या खासगी रुग्णालयांना महापालिकेने दर ठरवून द्यावेत. त्यापेक्षा जास्त आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी तसचं या रुग्णालयांविरोधात असलेल्या तक्रारींची तड लावण्यासाठी समिती स्थापन करा, असे आदेश शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले. लॉकडाउनचे काटेकोर पालन व्हावे यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घ्या. स्थानिक नगरसेवक आणि पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समित्यांची स्थापना करून विभागवार लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी करा असे निर्देश दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading