माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत येणारे प्रभाग क्रमांक १, २, ३ आणि ८ या प्रभागात कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज रात्रीपासून संपूर्ण क्षेत्र बंद करण्यात येणार आहे. माजिवडा-मानपाडा समितीतील या प्रभागात कोविडचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग होत असल्याचं निदर्शनास आल्यामुळे महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून १८ मे पर्यंत हे परिसर बंद ठेवण्यात येणार आहेत. लॉकडाऊन असूनही नागरिकांकडून सोशल डिस्टंन्सिंगचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत आहे. रस्ते, दुकाने, भाजीपाला मार्केट या ठिकाणची गर्दी कमी होत नसून त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे आता मासळी, मटन चिकन विक्रीची दुकाने, बेकरी, इतर वस्तूंची दुकाने, भाजीपाला, फळांची दुकाने, तात्पुरती मार्केट हे सर्व १८ मे पर्यंत बंद राहील आणि दूध, भाजीपाला, फळे, चिकन-मटण यांची घरपोच सेवा सुरू राहील तर अन्नधान्य, किराणा दुकाने आणि औषधं सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून सुरू राहतील याची नागरिकांनी नोंद घ्यावी असं महापालिकेतर्फे सांगण्यात आलं आहे.