कोरोना रूग्णांना त्यांच्या देयकामधील तफावतीचा परतावा त्वरीत मिळावा -संजय केळकर यांची मागणी

कोरोना रूग्णांना त्यांच्या देयकामधील तफावतीचा परतावा त्वरीत मिळावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. खासगी कोविड रुग्णालयांनी रुग्णांना दिलेली देयके आणि तपासणीसाठी ठाणे महापालिकेला सादर केलेली बिले यात मोठी तफावत आहे. कोविडच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत रुग्णांकडून जादा घेतलेल्या बिलापैकी ८८ लाखांचा परतावा करण्यात आला असून उर्वरित पाऊण कोटींचा परतावा रुग्णांना तातडीने मिळावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली. राज्य शासनाच्या निर्देशानुसार खासगी कोविड रुग्णालयांनी रुग्णांकडून ठरवून दिलेल्या दरानुसार उपचार शुल्क आकारणे आवश्यक आहे. मात्र पहिल्या लाटेत या रुग्णालयांनी सर्वसामान्य रुग्णांकडून अवाच्या सवा बिले आकारून त्यांची लूट केली. तर रुग्णांच्या नातेवाईकांनी भीतीपोटी ही जादा रकमेची बिले भरली. रुग्णांकडून जादा उकळलेली बिले रुग्णालयांनी परत करावीत यासाठी आमदार संजय केळकर प्रयत्नशील होते. रूग्णांची देयके आणि तपासणीसाठी महापालिकेकडे दिलेली बिले यात मोठी तफावत असल्याची बाबही केळकर यांनी निदर्शनास आणून दिली आहे. महापालिकेने खासगी रुग्णालयांकडून आलेल्या देयकांची तपासणी केली असता एक कोटी ६२ लाख ७३ हजार ५८३ रुपयांची जादा आकारणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी फक्त ८७ लाख ७३ हजार ९५८ एवढी जादा रक्कम रुग्णांना परत केली असल्याचे प्रशासनाने कळवले आहे. अद्याप ७५ लाख रुपयांचा परतावा रुग्णांना मिळणे बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा परतावा संबंधित रुग्णांना तातडीने मिळावा अशी मागणी संजय केळकर यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading