कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काम करणा-या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता वाटप करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दिले आहेत. कोविड19 करिता कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची दृकश्राव्य माध्यमातून त्यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हाच्या ग्रामीण भागात कोराना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या ग्रामस्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असून या कर्मचाऱ्यांना तात्काळ एक हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता वितरित करण्याचे निर्देश सोनावणे यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती, आरोग्य सेवक आदी कर्मचारी कोविड19 च्या कामासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत आहेत. त्यांना प्रोत्साहन म्हणून १ हजार रुपये भत्ता देण्यात येणार आहे. या बैठकीत तालुकानिहाय आढावा घेत ग्रामीण भागातील कोरोना संदर्भातील परिस्थिती त्यांनी जाणून घेतली. या काळात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५ टक्के असली तरी सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी मात्र दरदिवशी कार्यालयात हजर राहून कामकाज करावयाचे आहे. तर आवश्यक असल्यास प्रत्यक्ष ठिकाणी जाण्याच्या सूचनाही सोनवणे यांनी दिल्या. जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर या तालुक्यात कम्युनिटी किचनमुळे दररोज हजारो लोकांना जेवण पुरवले जात आहे. तसेच गरजू लोकांना स्थानिक स्तरावर अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. पंचायत समिती स्तरावर खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरण कक्ष तयार करण्यात येत आहे. शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतीने सतर्क राहण्याच्या सूचना देऊन या भागातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दररोज निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात यावी असंही त्यांनी सांगितले. कोरोनामुळे पाणी टंचाईच्या कामांना खीळ बसू नये यासाठी काहीच दिवसांपूर्वी ग्रामसभेची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे टंचाईच्या कामांकडे दुर्लक्ष न करता टंचाईच्या कामाकडे लक्ष देण्याची सूचना हिरालाल सोनवणे यांनी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading