कोपरी परिसरात पाण्याची अवाच्यासवा बीले आल्याने भारतीय जनता पक्षाचा आंदोलनाचा इशारा

शहरातील इतर भागांप्रमाणेच कोपरी आणि चेंदणी कोळीवाडा परिसरातही मीटरद्वारे पाणीपुरवठ्याची अवाच्या सवा बिले आल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोपरीवासियांनीही एल्गार पुकारला असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर वेळप्रसंगी मीटर उखडून टाकण्याचा निर्धारही केला आहे. कोपरी आणि चेंदणी कोळीवाडा परिसरात बहुतांशी मध्यमवर्गीय नागरिक राहतात. या नागरिकांना किमान १५०० रुपये पाणीबिल येत होते. मात्र, अचानक मीटरद्वारे केल्या गेलेल्या पाणीपुरवठ्याबद्दल किमान सहा हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत बिले आकारण्यात आली आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अचानक बिले पाठविल्यामुळे कोपरीत संतापाची लाट उसळली. याबाबत त्यांनी भरत चव्हाण यांच्याकडे व्यथा मांडली. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांवरील अन्याय सहन करणार नाही असा इशारा चव्हाण यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. महापालिकेच्या महासभेत मीटरनुसार आकारण्यात येणाऱ्या बिलांविरोधात निर्णय घेण्यात आला होता. मात्र महापालिका प्रशासनाने मुजोरीने ही पद्धत लादली. या प्रकरणी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येईल. त्यानंतरही प्रशासनाने निर्णय न घेतल्यास वेळप्रसंगी मीटर उखडून टाकू, असा इशारा माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिला. कोपरीतील काही भागात अजूनही पाणीपुरवठा अपुरा होतो. यापूर्वी सुमारे १३० ते १५० रुपये मासिक बिलांची आकारणी होत होती. आता काही नागरिकांना चक्क ५० हजार रुपये बिल धाडण्यात आले आहे. यापूर्वी पाणीमीटर लावून तर आता बिल देऊन कोट्यावधींचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप युवामोर्चाचे सचिव ओमकार चव्हाण यांनी केला. पाणीमीटरची तपासणी करण्यासाठी अधिकारी फिरकत नाहीत. एका नागरिकाला ९ हजार रुपयांचे बिल आले होते. त्याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडील मीटर उलटा बसविला असल्याचे निदर्शनास आले, अशी एका नागरिकाने तक्रार केली. कोपरी परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेक नागरिकांनी पाणी खेचण्यासाठी विजेच्या मोटर बसविल्या आहेत. त्यामुळे विजेचे बिल जादा येत असतानाच, आता पाण्याची जादा बिले महापालिकेने धाडली आहेत. त्यामुळे हजारो रुपयांच्या वीज व पाणीबिलांचे शुक्लकाष्ठ कोपरीवासियांच्या मागे आहे याकडे ओमकार चव्हाण यांनी लक्ष वेधले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading