कॉलसेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या उधळपट्टीला मनोहर डुंबरेंचा तीव्र विरोध

कोरोना हॉस्पिटलमधील बेड मिळविण्यात त्रस्त झालेल्या ठाणेकरांची आता लसीकरणासाठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र, कोविडचा संसर्ग झाल्यानंतर घरातच थांबलेल्या रुग्णांची केवळ एका फोनवर विचारपूस आणि सल्ला देण्यासाठी ठाणे महापालिका प्रती कॉल १५ रुपये मोजणार आहे. दररोज ६ हजार फोन कॉलचे कंत्राट प्रशासनाने दिले असून कॉलसेंटर कंपनीला ५४ लाख रुपये दिले जाणार आहेत. या कॉलसेंटरसाठी महापालिकेनेच सात लाख रुपये खर्चून चार डॉक्टरांचीही नियुक्ती केली आहे. त्यामुळे कॉलसेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या या उधळपट्टीला भारतीय जनता पक्षाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी तीव्र विरोध केला आहे.
कोविडची दुसरी लाट ओसरत आली असली तरी पहिल्या लाटेपाठोपाठ दुसऱ्या लाटेचाही ठाणेकरांना तडाखा बसला. प्रत्येक रुग्णाला बेड देण्यातही महापालिका प्रशासन अपयशी ठरले. भरलेले ग्लोबल हॉस्पिटल, ऑक्सिजनअभावी रिकामे पार्किंग प्लाझा हॉस्पिटल, कर्मचाऱ्यांअभावी सुरू न झालेले व्होल्टास आणि कळवा भूमिपूत्र हॉस्पिटल अशी परिस्थिती ठाण्याने पाहिली. मात्र आता कॉलसेंटरमधून होम क्वारंटाईन रुग्णांची काळजी घेण्याच्या गोंडस नावाखाली महापालिकेच्या प्रशासनाकडून तब्बल ६१ लाख रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. होम क्वारंटाईन, को-मॉर्बिड रुग्ण, कोरोनामधून बरे झालेले रुग्ण आणि लस घेतलेल्या नागरिकांची कॉलसेंटरमधून विचारपूस सुरू करण्यात आली आहे. त्यांना गरजेनुसार डॉक्टरांकडून सल्ला दिला जाणार आहे. मात्र, त्यासाठी महापालिका प्रती कॉल १५ रुपये मोजणार आहे. दररोज ६ हजार फोनकॉलद्वारे कॉलसेंटर कंपनीला दररोज ९० हजार रुपये प्रदान केले जाणार आहेत. कॉलसेंटरवरून सल्ला देण्यासाठी महापालिकेनेच चार डॉक्टरांची नियुक्ती केली असून त्यांच्यासाठी ७ लाख २० हजार रुपये खर्च केला जाणार आहे. अशा प्रकारे अवघ्या दोन महिन्यांत सुमारे ६१ लाख रुपयांची महापालिका उधळपट्टी करणार असल्याचा आरोप डुंबरे यांनी केला आहे. एका फोनकॉलसाठी १५ रुपये दर आकारणाऱ्या कॉलसेंटरलाच डॉक्टरांची नियुक्ती करण्याची अट का टाकण्यात आली नाही असा सवालही डुंबरे यांनी केला आहे. ज्या नागरिकांना डॉक्टरांच्या तातडीच्या सल्ल्याची आवश्यकता आहे, त्या रुग्णांसाठी महापालिकेने २४ तास हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा. या हेल्पलाईनवर फोन केल्यास नागरिकांना तातडीने मदत पाठविता येईल. त्याचबरोबर महापालिकेचा किमान ५० लाख रुपयांचा खर्चही वाचेल, अशी सुचना गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading