केडीएमसी च्या स्वच्छता अभियानातही राजकारण

केडीएमसी च्या स्वच्छता अभियानातही राजकारण  शिरले असल्याचे दिसुन आले. मोहने टिटवाळा येथे केडीएमसीच्या अ प्रभाग क्षेत्राच्या वतीने स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रशासनाने सर्व पक्षांना आमंत्रित केले होते. मोहने टिटवाळयाच्या भाजपाच्या महिला पदाधिकारीसुद्धा या कार्यक्रमात आल्या होत्या. यावेळी या विभागाच्या भाजपाच्या शहर अध्यक्षा मनीषा केळकर या कमळ पक्षाचं चिन्ह लावून आल्या म्हणून केडीएमसीचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी वार्ड अधिका-यांकडे हरकत घेतली. यावेळी भाजपाच्या महिलांनी कमळाचे चिन्ह उतरवले. कार्यक्रम संपन्न झाल्यावर केळकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पाटील यांनी शिवीगाळ केल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर युती धर्म त्यांनीही पाळावा असा टोलाही त्यांनी लगावला. पाटील यांची हकालपट्टी करण्याचीही मागणी करण्यात आली. मात्र पाटील  यांनी  हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित कार्यक्रम हा  शैक्षणिक होता. सर्व राजकीय पक्षांना तिथे आमंत्रित करण्यात आले  होते. यावेळी भाजपाच्या महिला कमळ चिन्ह लावून आल्या होत्या. याबाबत आपण अधिकाऱ्यांना प्रश्न केला की हा नेमका कार्यक्रम कोणता आहे? त्यावेळी त्यांनी शैक्षणिक कार्यक्रम असल्याचं सांगितले. आपल्या आक्षेपा नंतर महिलांनी कमळाचं चिन्ह उतरवलं देखील मात्र आपण कोणताही अपशब्द वापरला नसून आपल्याला केवळ बदनाम करण्यासाठी हा खटाटोप चालू असल्याचं पाटील यांनी सांगीतले. पाटील हे शिंदे गटात कार्यरत आहेत. त्यामुळे आतापासूनच दोन्ही पक्षात राजकीय फटाके फुटायला सुरवात झाली आहे. या प्रकरणी केळकर यांच्या तक्रारीवरुन खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading