केंद्र सरकारच्या स्वच्छ वायु सर्वेक्षण स्पर्धेत ठाणे शहराने देशपातळीवर पटकावला ३ रा क्रमांक

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाद्वारे संपूर्ण भारतात आयोजित केलेल्या स्वच्छ वायु सर्वेक्षण स्पर्धेत ठाणे शहराने देशपातळीवर ३ रा क्रमांक पटकावला आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी निवडण्यात आलेल्या १३१ शहरांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांतून ठाणे शहराने देशात ३ रा क्रमांक पटकावला. भोपाळ येथे झालेल्या कार्यक्रमात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रोख रक्क्म 50 लाख आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाअंतर्गत, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी 131 शहरांची निवड करण्यात आली होती. स्वच्छ वायु सर्वेक्षणचा एक नवीन उपक्रम, हवेच्या गुणवत्तेवर आणि 131 शहरांमध्ये शहर कृती आराखड्यांतर्गत मंजूर केलेल्या उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या आधारावर शहरांची क्रमवारी लावण्यात आली. या क्रमवारीसाठी देशभरातून निवडलेल्या एकूण 131 शहरांपैकी 10 लाखांहून अधिक रहिवासी असलेल्या श्रेणी 1 अंतर्गत 47 शहरे, 3 लाख ते 10 लाख लोकसंख्येची श्रेणी 2 अंतर्गत असलेली 44 शहरे आणि तीन लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेली श्रेणी 3 अंतर्गत 40 शहरे आहेत. स्वच्छ वायु सर्वेक्षणामध्ये समाजातील सर्व घटकांमध्ये जागरूकता पसरवणे, स्वचछ हवेच्या आरोग्यावरील फलदायी परिणामांबद्दल नागरिकांना माहिती देणे, वेगवेगळ्या शहरांमधील हवेच्या गुणवत्तेची तुलना करणे आणि सर्वांसाठी स्वच्छ हवेचे ध्येय साध्य करणे ही उद्दिष्टे आहेत. शहरांतील घनकचरा व्यवस्थापन, रस्ते बांधणी, ई-बस सुविधा, बांधकाम व विनाशक कचरा व्यवस्थापन, औद्योगिक प्रदूषण, शहरांतील पीयुसी सुविधा व पीयुसी तपासणी, रस्त्यांच्या कडेला व दुभाजकांवर वृक्ष लागवड, ई-वाहन चार्जिग सुविधा, शहरातील एकूण वाहनांच्या तुलनेत ई-वाहनांचे प्रमाण, सीएनजी व पेट्रोल पंपांची संख्या, जनजागृतीचे उपक्रम, इत्यादी घटकांच्या कसोटीवर स्वच्छ वायु सर्वेक्षण स्पर्धेत मुल्यांकन करण्यात आले. यात एकूण २०० गुणांपैकी १८५.२ गुण मिळवून ठाणे शहराने देशात ३रा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत मध्यप्रदेशातील इंदोर शहराने १८७ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला असून उत्तर प्रदेशातील आग्रा शहराने १८६ गुण प्राप्त करुन दुस-या क्रमांकाचा मान मिळवला आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading