कृषि विभागाच्या चित्ररथाद्वारे गुढी पाडव्याच्या शोभायात्रेत पौष्टिक तृणधान्यासंदर्भात जनजागृती

श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित शोभा यात्रेमध्ये ठाणे जिल्हा कृषि विभागाच्या वतीने पौष्टिक तृणधान्य विषयक जनजागृती रथाने सहभाग नोंदवून नागरिकांना तृणधान्याचे महत्त्व पटवून दिले. संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने राज्याने “महाराष्ट्र मिलेट मिशन” मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातही पौष्टिक तृणधान्याचा वापर वाढावा, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार गुढी पाडव्याच्या दिवशी शहरात झालेल्या शोभायात्रेमध्ये जिल्हा कृषि विभागाचा पौष्टिक तृणधान्याची माहिती असलेला रथ सहभागी झाला होता. भारतात विविध प्रकारची तृणधान्य घेतली जातात. या तृणधान्य वापरातून जे अन्नपदार्थ तयार केले जातात त्यांच्या मध्ये अनेक पोषक तत्वे असतात. आता हे धान्ये “श्री धान्य” म्हणून ओळखली जातात. त्यांची मागणी वाढावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत, जेणे करून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांला अधिक चांगले मूल्य मिळेल. तृणधान्य ग्लूटेन मुक्त देखील असतात आणि त्यांचा ग्ल्यायसेमिक निर्देशांक देखील कमी असतो. त्यामुळे मधुमेहसाठी हे धान्य वरदान ठरले आहे. तृणधान्याचे आरोग्य विषयक फायद्याची माहिती ठाणे शहरातील नागरिकांना करून देण्यासाठी कृषी विभागाने या चित्ररथाच्या माध्यमातून प्रयत्न केले. यासंदर्भातील माहिती नागरिकांना देण्यासाठी जिल्हा कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारीही या चित्ररथासोबत शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading