काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील सायकल स्टॅण्ड हटवून पालिकेचा उत्तुंग जाहिरात फलक

काही महिन्यांपूर्वी सायकल स्टॅण्डच्या उपयुक्ततेचा पुळका आलेल्या महापालिका प्रशासनाने आता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील सायकल स्टॅण्ड हटवून उत्तूंग जाहिरात फलक उभारला आहे. आले महापालिकेच्या मना तेथे कोणाचे चालेना, अशी शहराची स्थिती झाली असून, या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. ठाणे महापालिकेने शहरातील महत्वाच्या भागात ५० सायकल स्टॅण्ड उभारण्यासाठी कंत्राट दिले होते. संबंधित कंपनीने जाहिराती झळकविण्यासाठी २५ स्टॅण्ड उभारले. पूर्व द्रुतगती महामार्ग, पोखरण रोड क्र. २, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह आदी मोक्याच्या ठिकाणी सायकल स्टॅण्ड उभारले गेले. काही ठिकाणी अवघ्या ५०० मीटरच्या अंतरावर स्टॅण्ड उभारण्याची किमया साधली गेली. अवघ्या १७ लाख ५० हजारांच्या सायकलींच्या बदल्यात लाखो रुपयांचे हक्क आणि कोट्यवधींची जागा कंपनीच्या घशात घालण्यात आली आहे, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. ठाणेकरांकडून सायकलींचा वापरही होत नसताना महत्वाच्या जागांवर सायकल स्टॅण्ड जाहिराती झळकवित उभे आहेत. त्याचबरोबर महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा जाहिरात महसूलही बुडत आहे, असा आरोप नारायण पवार यांनी केला. सायकल प्रकल्प सुरू झाल्यापासून काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर सायकल स्टॅण्ड उभारण्यात आला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी अचानकपणे सायकल स्टॅण्ड बंद करण्यात आला. त्याऐवजी तेथे भले मोठे उत्तूंग होर्डिंग झळकविण्यात आले. तसेच जाहिरातीसाठी क्रमांकही देण्यात आला, याकडे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले. या प्रकाराला आशिर्वाद कोणाचा? संबंधित सायकल स्टॅण्डची जागा होर्डिंगसाठी का देण्यात आली? याबाबत करार केला आहे का? संबंधित जाहिरात फलकापोटी महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी किती रक्कम पडणार आहे? संबंधित जाहिरात फलकाचे हक्क देण्यात आलेल्या कंपनीचे नाव काय? सायकल स्टॅण्ड हटविण्याचे कारण काय?आदी प्रश्नांची सरबत्ती ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading