कापुरबावडी, माजिवडा जंक्शनची पुनर्आखणी केली जाणार

कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शन येथील वाहतुकीचे परिचलन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी या दोन्ही जंक्शनची पुर्नआखणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सविस्तर आराखडा करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शनवरील वाहतुकीचे परिचलन अनियोजित पद्धतीने होत आहे. मोकळ्या मैदानात वाहने हवी तशी ये जा करत असल्याचे चित्र या भागात दिसते. हे चित्र बदलण्यासाठी लेन मार्किंग, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक बेटाची रचना यांचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. वाहतुकीचे परिचलन सुनियोजित पद्धतीने व्हावे म्हणून आराखडा तयार करून त्याची जलद अंमलबजावणी करण्यात येईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले. कापूरबावडी नाका, माजिवडा नाका येथील उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागांवर असमाजिक तत्त्वांचा वावर असतो, गर्दुल्ले असतात. अनधिकृत पार्किंग केले जाते. याला आळा बसण्यासाठी मळक्या, अस्वच्छ जागा साफ करून तेथे नियंत्रित अधिकृत पार्किंग केले जाणार आहे. त्यासाठी निविदा मागवल्या जात आहेत. जागेच्या वापराबरोबर महापालिकेस त्यातून उत्पन्नही मिळेल, असे आयुक्तांनी नमूद केले. त्याचबरोबर, वागळे इस्टेट मधील पासपोर्ट कार्यालय येथेही अधिकृत पार्कींग साठी निविदा मागविल्या जात आहेत. या भागात अनधिकृत पार्किंग केले जाते आणि त्याचे पैसेही आकारले जातात अशा तक्रारी आल्या होत्या. त्याबद्दल पालिकेने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. पावसाळ्यात विटावा पुलाखाली जमणारे पाणी वाहतुकीस अडथळा करते. त्यामुळे त्या भागाची वाहतूक पोलिसांबरोबर संयुक्त पाहणी करण्यास सांगितले. तसेच, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन येथे झेब्रा क्रॉसिंगचे काम पावसाची उघडीप असतानाच करून घ्यावे, नितीन कंपनी चौकातील सिग्नलची आवश्यकता, वाहनांना दिला जाणारा वेळ यांचा आढावा घ्यावा, रेल्वे स्टेशन परिसर फेरीवालामुक्त राहील, याची काळजी घ्यावी. तसेच, रिक्षा परिचलनाला शिस्त लागण्यासाठी तेथे वाहतूक पोलिसांचे सहकार्य आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading