कळवा ते कोपरी परिसरातील कांदळवनातही श्रमदान

परिसर, शहर स्वच्छ करू आणि ठाण्याचे नाव देशात चमकवू अशी प्रतिज्ञा करत शाळा आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवी संस्था, सफाई कर्मचारी अशा शेकडो ठाणेकरांनी इंडियन स्वच्छता लीग 2 या उपक्रमासाठी कोपरी ते कळवा परिसरातील कांदळवन आणि पारसिक हिल येथे श्रमदान केले. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली, कोपरी- मिठबंदर रोड येथील गणेश विसर्जन घाट आणि पारसिक टेकडी येथे शनिवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७.३० वाजल्यापासून विविध टप्प्यात चाललेल्या या स्वच्छता मोहिमेची दु. १२.३०च्या सुमारास सांगता झाली. दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. कोपरी येथे युनायटेड शाळा, श्री. मां शाळा, मंगला हायस्कूल, भारत शाळा आणि महाविद्यालय, नाखवा हायस्कूल, के. सी. महाविद्यालय, पीपल्स एज्युकेशन शाळा, विद्यासागर महाविद्यालय, नानिक इंग्लिश हायस्कूल, ठाणे महापालिका शाळा क्रमांक ३ आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.
कोपरी गणेश विसर्जन घाट, सिडको पुल, सुभाषनगर मरीन चौकी, चेंदणी कोळीवाडा घाट, कळवा विसर्जन घाट, विटावा घाट या परिसरातील कांदळवन स्वच्छता करण्यात आली. त्यात, पर्यावरण दक्षता मंच, खाडी संवर्धन मंच यांचे स्वयंसेवक, ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या एन एस एस चे विद्यार्थी, स्थानिक लोक प्रतिनिधी, स्थानिक कोळी बांधव, सफाई कर्मचारी, महापालिका अधिकारी आदी सहभागी झाले होते. ३५ बोटींचा ताफा या मोहिमेत होता.
या संपूर्ण खाडी, कांदळवन स्वच्छता मोहिमेत ठाणे, विटावा,दिघा, दिवा,ऐरोली येथील मच्छिमारीच्या बोटी असणाऱ्या सर्व कोळी , मच्छिमार भूमिपुत्र बांधवांनी ठाणे खाडी आणि त्याचे किनारे स्वच्छ करून, कांदळवन स्वच्छ करून आपले आद्य कर्तव्य ओळखून ठाणे खाडी तसेच पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी बहुसंख्येने सहभागी होऊन आपला खारीचा वाटा उचलला. सर्व मानव जातीने भारतीयांनी हि आपले आद्य कर्तव्य समजून या पुढे कधीही समुद्र,खाडी आणि त्यांचे किनारे स्वच्छ करून आणि यापुढे कधीही ते प्रदुषित करणार नाही ठाणे खाडीत निर्माल्य, कचरा, प्लास्टिक पिशव्या टाकणार नाही हा दृढ निश्चय मनाशी करून पुढील दैनंदिन जीवन जागवे आणि ठाणे खाडी प्रदुषित करण्यापासून वाचवावी असं आवाहन सर्व कोळी मच्छिमार बांधवांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या ठाणेकर नागरिकांना तसेच काही कारणास्तव स्वच्छता मोहिमेत उपस्थित न राहू शकलेल्या ठाणेकर नागरिकांना केले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading