इंडियन स्वच्छता लीग दोनचा जल्लोषात शुभारंभ

स्वच्छतेचा संदेश देणारे फलक, पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या प्रतिकृती, गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धा आणि स्वच्छतेची सगळ्यांनी घेतलेली शपथ असा अतिशय देखणा सोहळा रविवारी दादोजी कोंडदेव क्रीडांगण येथे हजारो विद्यार्थी, शिक्षक, सफाई कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यात, विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील खाजगी शाळा, महापालिका शाळा येथील विद्यार्थी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. शाळांनी संकल्पनात्मक रचना या विषयावरील स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांच्या संकल्पना, प्रकल्प, सादरीकरण यांचे परीक्षकांनी परीक्षण केले. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी स्वच्छ्ता राखण्याचे महत्त्व थोडक्यात सांगितले. इंडियन स्वच्छता लीग हा स्वच्छतेचा महोत्सव आहे. त्यानिमित्ताने, ठाणे महापालिकेत सफाई काम करणाऱ्या कांता ठाकूर आणि अनिल ठाकूर या दाम्पत्याचा प्रातिनिधिक सन्मान आजच्या सोहळ्यात करण्यात आला. या दाम्पत्याच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विविध लाभदायी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. इंडियन स्वच्छता लीग 2 मधील ठाणे टायटन्स या ठाणेकर नागरिकांच्या संघाचे कर्णधार अभिनेते भाऊ कदम आणि या उपक्रमाच्या दूत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी ठाकूर दाम्पत्याचा सन्मान केला. भाऊ कदम यांनी स्वच्छतेत ठाणे शहर देशात अव्वल यावे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तर, मधुराणी प्रभुलकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वच्छतेचा संदेश घरोघरी घेवून जाण्याचे आवाहन केले. या सोहळ्यात, विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. त्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. डिमॉलिशन या समूहाने सादर केलेले शिवनाट्य, श्यामोली यांनी सांगितलेली टाकावू कचऱ्यातून टिकावू कलाकृतींची गोष्ट, स्टॅण्ड अप कॉमेडिअन पुष्कर बेंद्रे यांनी रंगवलेले विनोद आणि आफरिन बॅण्डने सादर केलेली गाणी या कार्यक्रमांचा सोहळ्यात समावेश होता. ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्य सोहळा सुरू असतानाच क्रीडांगण परिसरात पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धा झाली. त्याला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading