कल्याणमध्ये एका शाळेत साप निघाल्यानं वर्गात भंबेरी उडाली.
कल्याण पश्चिमेतील शशांक विद्यालयात शाळा भरल्या नंतर वर्गात तास सुरु असताना विद्यार्थ्याच्या बाकाखाली शिक्षक आणि विद्यार्थ्यांना साप दिसला. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांची भीतीने चांगलीच तारांबळ उडाली. पुस्तके आणि दप्तर सोडूनच विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही शाळेच्या बाहेर धूम ठोकली. शाळेत साप असल्याची माहिती सर्प मित्रांना मिळताच सर्प मित्र दत्ता बोंम्बे यांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांच्या बाकाखाली लपलेल्या सापाला पकडले. साप पकडल्याचे पाहून विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडला. शाळेत पकडलेला साप हा बिनविषारी धामण जातीचा होता. वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने लगेच त्याला जंगलात सोडले जाणार असल्याचे सर्पमित्र दत्ता बोबे यांनी सांगीतले.