कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली एजंटांनाच १७ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार

कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली एजंटांनाच १७ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कर्ज मंजूर करून देतो असं सांगून बनावट पत्र आणि पावत्या देऊन दोन एजंटची फसवणूक या व्यक्तीने केली आहे. कळव्यात राहणारे एक एजंट बँक तसंच पतपेढीतून कर्ज देण्याचे काम करतात. गेल्यावर्षी त्यांची एका व्यक्तीशी ओळख झाली. या व्यक्तीने आपली फायनान्स कंपनी असून कंपनीमध्ये आपली पत्नीही संचालक असल्याचं सांगितलं. कर्जासाठी जे लोक येतील त्यांची प्रकरणं मंजूर करून देऊ, आमच्याकडे पेपर द्या असं सांगून एजंटकडे प्रक्रिया शुल्काची मागणीही केली. त्यानुसार एजंटनी ९ जणांची कागदपत्रं या व्यक्तीकडे दिली आणि ३ लाख ९२ हजार रूपये प्रक्रिया शुल्क भरले. त्यानंतर दुस-या एजंटकडूनही साडेपाच लाख रूपये प्रक्रिया शुल्क घेतले आणि इतर कारणांसाठीही काही रक्कम घेतली. त्यानंतर कर्ज मंजूर झाली नाहीत म्हणून या एजंटनी चौकशी केली असता रिझर्व्ह बँकेनं निधी गोठवल्याचं सांगितलं तसंच रिझर्व्ह बँकेचे पत्र आणि काही पावत्या दिल्या. परंतु चौकशीअंती हे सर्व बनावट असल्याचं लक्षात आल्यानंतर या दोघांची फसवणूक झाल्याचं समजलं. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात संतोष कळेकर आणि पूजा कळेकर या दाम्पत्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading