कचरा वर्गीकरणाबाबत आयुक्त अभिजीत बांगर यांनी साधला सिंघानिया शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद

ठाणे महापालिका आयुक्तांनी कचरा वर्गीकरणाबाबत सिंघानिया शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत आज संवाद साधला. ठाणे शहर स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. ठाणे महापालिका आणि ठाण्यातील आर. निसर्ग फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने कचरा वर्गीकरणाबाबत शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आगळी – वेगळी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सुलोचनादेवी सिंघानिया या शाळेचे विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीत नागरिकांमध्ये जनजागृती करणार असून प्रत्यक्ष कामास त्यांनी सुरूवात केली आहे. या संदर्भात आज आयुक्त अभिजीत बांगर यांनी आर निसर्ग स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी आणि सिंघानिया शाळेतील विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. नगरविकास दिनानिमित्त झालेल्या पुरस्कार वितरण सोहळयात ठाणे महापालिका आणि आर. निसर्ग फाऊंडेशनच्या माध्यमातून सिंघानिया शाळेच्या विद्यार्थ्यांनी कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत सादरीकरण केले. या सादरीकरणातून त्यांनी महात्मा गांधीजीच्या तीन माकडांनी दिलेल्या ‘बुरा मत सुनो, बुरा मत बोलो, बुरा ना देखो’ या संदेशाचा आधार घेत स्वच्छतेबाबतही ‘सुका कचरा, ओला कचरा, घरगुती घातक कचरा’ असे वर्गीकरण करा असा संदेश देतानाच आपल्या घराप्रमाणे आपला परिसर आणि शहरही स्वच्छ ठेवले पाहिजे अशी जनजागृतीही सादरीकरणाच्या माध्यमातून केली. आज या विद्यार्थ्यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेवून या मोहिमेबद्दल अधिक माहिती देत संवाद साधला. यावेळी ओला कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा, सुका कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा, घरगुती घातक कचऱ्यासाठी काळ्या रंगाचा डबा वापरावा हे विद्यार्थ्यांनी विषद केले. यावेळी आयुक्तांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सिंघानिया हायस्कूलचे 500 शालेय विद्यार्थी उन्हाळयाच्या सुट्टीत घरोघरी जावून नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करणार आहेत. शालेय जीवनातच मुलांमध्ये देशाप्रती प्रेम निर्माण करुन त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये विविध उपक्रमांबाबत जनजागृती केल्यास ती अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यत पोहचण्यास मदत होणार आहे. आगामी काळात या मोहिमेमध्ये ठाण्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावेत जेणेकरुन ही मोहिम कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांपर्यत पोहचण्यास मदत होईल. तर यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading