ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये पदपथांवर शोभिवंत रेलिंग लावण्यासाठी राज्य शासनाकडून २५ कोटींचा निधी मंजूर

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये पदपथांवर शोभिवंत रेलिंग लावण्यासाठी राज्य शासनाकडून २५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघातील नागरिकांना चालण्यासाठी रस्त्याच्या बाजूला महापालिकेच्या माध्यमातून पदपथ बांधण्यात आले आहेत. परंतू या पदपथांची अवस्था खराब झाली असून नागरिकांना चालण्यास त्रासदायक होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे पदपथ सुधारणा करण्याची मागणी केली होती. सरनाईक यांनी याबाबत नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला. पदपथांवर शोभिवंत रेलिंग लावण्यासाठी २५ कोटी निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात ५ कोटी निधी वितरित केला आहे असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रभागाप्रमाणे पदपथाचे काम केल्यामुळे पदपथ एकसारखे दिसत नाहीत. तसेच मतदारसंघातील काही ठिकाणी पदपथ उखडलेल्या स्थितीत असून पदपथाच्या कडेला लावलेले रेलिंग लोखंडी असल्यामुळे उन्हा-पावसामुळे खराब झाले आहेत. तसेच काही ठिकाणी रेलिंग नसल्यामुळे पदपथावर फेरीवाले, भाजीवाले, हातगाडीवाले बसतात. त्याचप्रमाणे दुचाकीस्वार गाड्या चालवितात आणि काही ठिकाणी रिक्षा, दुचाकी, चारचाकी गाड्या पार्किंग केलेल्या असतात. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत असतो. त्यामुळे अपघातही होण्याचा संभव असतो. यावर उपाय योजना करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५ कोटी निधी महापालिकेकडे वर्ग करण्यात आला असून त्याचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे. फुटपाथवरून नागरिकांना ये-जा करताना चालण्यास कोणताही त्रास होऊ नये यासाठी पदपथांवर टाईल्स लावण्यात येतील. तसेच मुंबई महापालिकेच्या धर्तीवर कास्टिंग आणि लोखंड मिश्रण असलेले शोभिवंत रेलिंग बसविण्यात येईल. पदपथांच्या बाजूला शोभिवंत झाडे, शोभिवंत विद्युत दिवे लावण्यात येईल. त्यामुळे पदपथ आकर्षक दिसून नागरिकांना चालताना आल्हाददायक वाटेल. तसेच फुटपाथवर शोभिवंत रेलिंग लावल्यामुळे पदपथांवर फेरीवाले, भाजीवाले, हातगाडीवाले बसणार नाहीत आणि मोटार गाड्यांमुळे होणारे अपघात टाळता येतील असे सरनाईक यांनी सांगितले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading