ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्ह्यात ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ऑक्सिजन पुरवठा, रुग्णालयातील व्यवस्था, मनुष्यबळ यांचा आढावा घेऊन संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले. ओमायक्रॉन संसर्ग रोखण्यासाठी तसेच तिसऱ्या लाटेविरुद्ध तयारीसंदर्भात आज जिल्हाधिका-यांनी आरोग्य यंत्रणेसह संबंधित विभागांची बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील रुग्णालायातील बेडची उपलब्धता, प्राणवायूचा साठा, औषधे, कोवीड सेंटर यांचा आढावा घेण्यात आला. कोवीडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने अनेक कोवीड सेंटर सुरू केले होते. यातील काही सेंटर हे शाळा, आश्रमशाळांमध्ये होते. आता शाळा सुरू झाल्याने तेथील कोवीड सेंटर हलविण्यात यावे. त्यासाठी पर्यायी व्यवस्थेचे नियोजन करावे. तसेच कोवीड केंद्रांमधील अग्निशमन यंत्रणांची तपासणी करून अहवाल सादर करावा. कोरोना उपचार करण्यात येणाऱ्या रुग्णालयांमध्ये पुरेसा प्राणवायूचा साठा उपलब्ध ठेवण्यात याव्यात. औषधे आणि प्राणवायू पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या संपर्कात राहून उपलब्धता राहिल याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागात लसीकरण वाढविण्यात याव्यात. तसेच मतदारसंघनिहाय लसीकरणाचा आढावा घ्यावा. केंद्र शासनाने लहान मुलांच्या लसीकरणास मंजुरी दिली आहे. ठाणे जिल्ह्यात सुमारे साडेचार लाख विद्यार्थी आहेत. त्यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात यावे. तसेच इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना शाळेतच लस देण्यासंदर्भात नियोजन करावे. त्यासाठी त्यापूर्वी पालकाचे सहमती पत्र घेण्यात यावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी यावेळी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading