ऑक्सीजन कॉन्सट्रेटर खरेदी करण्यासाठी आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून ३० लाख रूपये

प्राणवायूच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे जीव नाहक गमवावा लागत असल्याचे प्रकार घडत असताना हवेतील प्राणवायू शोषून रुग्णाला नाकावाटे पुरवणारे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन संजीवनी ठरत आहे. ही यंत्रे ठाण्यातील कोविड रुग्णांसाठी मिळावीत यासाठी आमदार संजय केळकर यांनी आमदार निधी दिला आहे. या यंत्रांमुळे शेकडो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे. सध्या राज्यासह ठाणे शहरात प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांना नाहक जीवही गमवावा लागत आहे. ही अडचण ओळखून केळकर यांनी जिल्हा नियोजन समितीला पत्र देऊन ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्रे खरेदीसाठी ३० लाखांचा आमदार निधी दिला आहे. ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा, व्होल्टास, ग्लोबल यासारख्या कोविड रुग्णालयात शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. दररोज दीड हजारांच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. काही रुग्णांना प्राणवायू नसल्याने दाखल करुन घेतले जात नाही. प्रसंगी रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवले जाते. या ओढाताणीत रुग्णांच्या जीवावरही बेतू शकते. वीजेवर चालणारे हे यंत्र हवेतील प्राणवायू शोषून रुग्णांना नाकावाटे पुरवणार असल्याने रुग्णांचा जीव वाचणार आहे. ४५ हजार ते एक लाखापर्यंत किंमत असलेले हे यंत्र अशा रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वापरायचे आहे, अशी माहिती केळकर यांनी दिली. या यंत्रखरेदीनंतर हजारो ठाणेकर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे. संजय केळकर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासही विविध वैद्यकीय सुविधांकरीता २० लाखांचा निधी दिला आहे. या रुग्णालयातही शेकडो कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये, पुरेशा सोयी-सुविधा निर्माण व्ह्यव्यात यासाठी हा निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाबाधित रुग्णाची शरिरातील ऑक्सिजन पातळी कमी असते. रुग्णालयात दाखल असलेला रुग्ण बरा होत असतानाही ही पातळी कधी कधी कमी असते. अशावेळी त्याला कृत्रिमरित्या ऑक्सिजन नाकावाटे पुरवण्याची गरज असते. हवेत २० ते २१ टक्के ऑक्सिजन असतो. हवेतील हा नेमका प्राणवायू शोषून रुग्णाला नाकावाटे देण्याचे काम हे यंत्र करते. रुग्णाला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन देण्यासाठी या यंत्रात एका नॉबची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता जाणवत असताना हे यंत्र रुग्णांचे जीव वाचवू शकते असं संजय केळकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading