एसी लोकलच्या भाड्यात ५० टक्के कपात

एसी लोकलच्या भाड्यात ५० टक्के कपात करण्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या एसी लोकलमुळे प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार अशी आशा असताना या प्रवासासाठी अवाच्या सव्वा भाडे द्यावे लागत असल्याने रेल्वे प्रवाशांनी या प्रवासाकडे पाठ फिरवली होती. एसी लोकलचे प्रवासी वाढवायचे असल्यास त्याच्या भाड्यात कपात करण्याची मागणी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्याला प्रतिसाद देत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एसी लोकलच्या भाड्यात 50 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रति पाच किलोमीटर प्रवासासाठी 60 रूपयांऐवजी 30 रूपये द्यावे लागणार आहेत. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान रेल्वे संबंधित अनुदान मागणी संदर्भातील चर्चेमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे विषयक प्रवाशांच्या मागण्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. यात प्रामुख्याने एसी लोकलच्या भाडे आकारणीचा विषय शिंदे यांनी आग्रहाने मांडला होता. एसी लोकलचे भाडे या मार्गावर सेकंड क्लास रेल्वे प्रवासाच्या १० पटीने आहे. तर फस्ट क्लास पेक्षा दुप्पट जास्त भाडे आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हे भाडे परवडणारे नसल्याचे सांगत पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांचा खऱ्या अर्थाने दैनंदिन प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना काहीच फायदा होत नाही असे निरिक्षण श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत नोंदवले होते. त्यामुळे या मार्गावर जास्तीत जास्त फेऱ्या या नॉन एसी लोकल रेल्वे सेवेच्या सुरू कराव्यात किंवा एसी लोकल रेल्वे सेवेचे भाडे कमी करावे अशी आग्रही मागणी शिंदे यांनी केली होती. अखेर आज एका कार्यक्रमात बोलताना एसी लोकलचे भाडे सुमारे 50 टक्क्यांनी कमी केले जाईल, अशी घोषणा केली. त्यामुळे एसी लोकलसाठी आता प्रति पाच किलोमीटरसाठी आकारले जाणारे 60 रूपये भाड्याऐवजी अवघे 30 रूपये द्यावे लागणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading