एसटीने तब्बल २ लाख मजुर-श्रमिकांना सोडलं त्यांच्या गावी

राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीने गेल्या १० दिवसांत राज्याच्या विविध भागातील तब्बल २ लाख १ हजार ९८८ श्रमिक – मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहचविले आहे. त्यासाठी महामंडळाच्या हजारो चालकांनी अहोरात्र मेहनत करून तब्बल १५ हजार ३६७ बसेसद्वारे ही बहूमोल कामगिरी केली आहे. गेली ७२ वर्ष राज्याच्या सर्वसामान्य जनतेला सुरक्षित प्रवासी दळणवळण सेवा देणाऱ्या एसटीने वेळोवेळी आपले सामाजिक भान जपत, संकटात राज्यातीलच नव्हे तर देशातील विविध घटकांना मदतीचा हात पुढे केला आहे. आज कोरोना महामारीच्या जागतिक संकटाला सामोरे जात असताना राज्य शासनाच्या निर्देशानुसार २३ मार्चपासून अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या हजारो कर्मचाऱ्याना दळणवळणाची सेवा एसटी मार्फत पुरविण्यात येत आहेत. त्याचबरोबर ९ मे पासून एसटीच्या बसेस आपल्या गावी जाण्याच्या ओढीने भर उन्हा-तान्हात कुटुंबासमवेत पायपीट करणाऱ्या श्रमिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूप सोडण्यासाठी धावत आहेत. साहजिकच यामुळे महाराष्ट्राची लोकवाहिनी ही बिरुदावली अभिमानाने मिरवणारी एसटी देशपातळीवर देखील गौरवास पात्र ठरली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading