एक सप्टेंबरपासून ठाणे महापालिका क्षेत्रात सफाईची जबाबदारी नवीन शिलेदारांवर

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते सफाईसाठी ०१ सप्टेंबरपासून नवीन व्यवस्था सुरू होत आहे. ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या मोहिमेत ठाणे शहरात स्वच्छतेचे नवे पर्व सुरू होत असून त्यात सफाईच्या वेळा, गणवेश, साधने यात बदल केला जात आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. ठाणे महापालिका क्षेत्रात साफसफाईसाठी महापालिकेच्या सेवेतील सफाई कर्मचारी आणि कंत्राटदारांकडून नेमलेले सफाई कर्मचारी कार्यरत असतात. ०१ सप्टेंबरपासून कंत्राटी सफाई कंत्राटदारांच्या नवीन कंत्राट कालावधीस सुरूवात होणार आहे. स्वच्छतेचा दर्जा चांगला असावा यासाठी संबंधित कंत्राटांमध्ये अटी शर्तीत सुधारणा करण्यात आल्या आहेत. महापालिका क्षेत्रात एकूण २३ गट सफाईसाठी कार्यरत असतील. त्यांचा वार्षिक खर्च सुमारे ४५ कोटी रुपयांच्या घरात आहे. दररोज सकाळी सहा वाजता रस्ते सफाईचे काम सुरू होणे आणि सकाळी ८.३० वाजेपर्यंत महापालिका क्षेत्रातील सर्व मुख्य रस्त्यांची सफाई केली पूर्ण जाणे अपेक्षित आहे. त्यानंतर अंतर्गत रस्ते साफ केले जातील. हे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जावे असे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले आहेत. पहिल्या दिवसापासून ही कालमर्यादा पाळली जावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर, दुपारी चार ते रात्री १२ या वेळेत दुसऱ्या टप्प्यातील सफाई केली जाणार आहे. आतापर्यंत एका गटामार्फत रात्र पाळीतील सफाई होत होती. त्यात आणखी एका गटाची भर घालण्यात आली आहे. कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याना यापुढे वेगळे गणवेश दिले जातील. त्यातही सकाळी काम करणाऱ्यांचा गणवेश रंग वेगळा असेल. तर, संध्याकाळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गणवेश वेगळा राहील. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी पूर्वीप्रमाणेच खाकी गणवेश परिधान करतील. एकूण १३ कंत्राटदारांच्या मदतीने २३ गटांच्यामार्फत शहर स्वच्छतेचे काम केले जाणार आहे. रस्ते झाडून जमा झालेला कचरा वाहून नेण्यासाठी आतापर्यंत पत्र्याची गाडी वापरली जात असे. यापुढे टप्प्याटप्याने सगळीकडे १२० किंवा २४० लिटरचे डबे दिले जाणार आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या तसेच, झपाट्याने होणारा विकास लक्षात घेता आणि रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचे वाढते प्रमाण पाहता यांत्रिकी पद्धतीने साफसफाईवर अधिक भर देणे गरजेचे आहे. एकूण सहा गाड्यांद्वारे प्रमुख रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने सफाई करून त्या रस्त्यांवरील मोकळे झालेले मनुष्यबळ अंतर्गत रस्त्यांवर वळवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त बांगर यांनी दिली.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading