उद्योगांना लागणाऱ्या सर्व सुविधा आणि प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन तत्पर – उद्योगमंत्री उदय सामंत

शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत असलेल्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने आयोजित जागतिक स्तरावरील बॉयलर इंडिया 2022 प्रदर्शन, चर्चासत्र आणि कार्यशाळेचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत आणि कामगार मंत्री तथा परिषदेचे स्वागताध्यक्ष सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. राज्यात उद्योगासाठी पूरक वातावरण असून उद्योगांना लागणाऱ्या सर्व सुविधा आणि प्रोत्साहनपर पॅकेज राज्य शासन देईल, असे प्रतिपादन उदय सामंत यांनी यावेळी केले. या प्रदर्शनात जर्मनी, स्विझरलँड, इंग्लंड या देशासह दहा देशातील सुमारे 280 उद्योजकांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे. बाष्पके संबंधीत विविध यंत्रे, साहित्य यांची मांडणी येथे आहे. याशिवाय बाष्पके उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञान, घडामोडी यांची माहिती होण्यासाठी चर्चासत्र आणि परिसंवादाचे आयोजन तीन दिवस चालणार आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी बॉयलर क्षेत्राशी संबंधित तीन पुस्तकांचे प्रकाशन मंत्रीच्या हस्ते करण्यात आले. बाष्पके क्षेत्रात होणारे बदल, या क्षेत्रासंबंधीची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त आहे. कामगार आणि उद्योग विभाग एकत्र येऊन उद्योगांना चांगल्या सुविधा देऊ. सध्या असलेल्या आणि नवीन उद्योगांनाही इतर राज्यांपेक्षा विज, जमीन आणि इतर प्रोत्साहनपर सुविधा शासन देईल. राज्यात नवनवीन उद्योग येण्यासंदर्भात प्रधानमंत्र्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली असून वेदांतापेक्षाही मोठा उद्योग राज्यात आणण्यात येईल असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. व्यवसाय सुलभीकरण अंतर्गत राज्यातील 392 सेवा ऑनलाईन झाल्या असून त्यापैकी 41 सेवा या कामगार विभागाशी संबंधित आहेत. त्यातही बॉयलर विभागाच्या सर्वाधिक सेवा ऑनलाईन झाल्या आहेत. व्यवसाय सुलभीकरणामध्ये कामगार विभागाने मूलभूत आणि महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्याअंतर्गत एक खिडकी योजना राबवून एकाच अर्जावर सर्व परवाने देण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असेही कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading