उद्यापासून मर्यादित वेगाने पाचवी-सहावी मार्गिका सुरू होणार

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चिले जात असलेल्या पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात पाचव्या सहाव्या रेल्वे मार्गिकेवरून पूर्ण क्षमतेने लोकलसेवा सुरू होईल खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. उद्यापासून मर्यादित वेगाने यावरून लोकल सुरू होतील. या आजच्या कामानंतर आणखी तीन वेळा रेल्वे मेगाब्लॉक घेईल, यात ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे ते फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा वापर सुरू होईल, असेही श्रीकांत शिंदे यांनी रविवारी सांगितले. कल्याण-ठाणे दरम्यान पाचव्या – सहाव्या मार्गिकेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. गेल्या काही वर्षात या दोन मार्गिकांसाठी सातत्याने पाठपुरावा करत श्रीकांत शिंदे यांनी कामाला गती दिली. काम मार्गी लावण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ही या कामाला गती दिली. रविवारी या मार्गिकांच्या तपासणीचे आणि महत्त्वाचे अभियांत्रिकी कार्य सुरू होते. त्यासाठी रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला. यादरम्यान कामाच्या प्रत्यक्ष ठिकाणी शिंदे यांनी भेट दिली. यावेळी मध्य रेल्वेचे मुंबई व्यवस्थापक शलभ गोयल, एमआरव्हीसीचे विकास वाडेकर उपस्थित होते. त्यांनी कामाची पाहणी केली. या प्रसंगी माध्यमांशी बोलत असताना पाचवी सहावी मार्गिका येत्या महिनाभरात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण क्षमतेने वापरात येईल अशी माहिती त्यांनी दिली. दिवा आणि ठाणे दरम्यान असलेल्या या साडे 9 किलोमीटरच्या मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गाला 2007-08 या वर्षात प्रथमच मंजुरी देण्यात आली होती. मात्र याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात 2015-16 मध्ये झाली. यापूर्वी तीन वेळा मेगाब्लॉक मध्ये या प्रकल्पाची महत्वाची कामे पूर्ण करण्यात यश आले होते. आजही ट्रॅक लेन ,ट्रॅक अलायनमेंट आणि पुलाची क्षमता तपासण्याचे काम सुरू असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या मार्गाने अलायनमेंट बदलण्यात आले होते. यातील पुलाचा भाग हा साडे चार किलोमीटर आहे. त्याची आता तपासणी केली जाते आहे. उद्यापासून यावर मर्यादित वेगाने लोकल सुरू होतील. टप्याटप्याने वेग वाढवून लोकल यावरून चालवल्या जातील. तोपर्यंत या भागातून लोकल जाताना त्याचा वेग कमी असेल. त्यामुळे काही अंशी वेळापत्रक बिघडू शकते. मात्र प्रवाशांनी इतकी वर्षे सहकार्य केले आहे. यापुढे त्यांनी सहकार्य करावे, अशी आशाही शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. आज मेगा ब्लॉक मध्ये प्रवाशांचा प्रवास विना अडथळा व्हावा, यासाठी टीएमटीने बस उपलब्ध केल्या आहेत. दुपारपर्यंत 70 हुन अधिक बसेस प्रवाशांना घेऊन धावल्या आहेत. परिवहन सभापती, व्यवस्थापक स्वतः सॅटिसवर थांबून याची पाहणी करत आहेत, असेही यावेळी श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. पुढच्या आठवड्यात याच कामासाठी आणखी एकदा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. तसेच एकूण तीन मेगाब्लॉक 6 फेब्रुवारीपर्यंत घेतले जातील असेही शिंदे यावेळी म्हणाले. या कामामुळे लोकल रेल्वे त्यातही फास्ट लोकल आणि एक्सप्रेस यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होतील. त्यामुळे रेल्वे स्थानकात क्रॉसिंगचा प्रश्न राहणार नाही. परिणामी लोकलच्या फेऱ्या वाढविण्यास मदत होईल असेही शिंदे यांनी सांगितले .या दोन मार्गामुळे शटल सेवा आणि लोकल फेऱ्या वाढण्याची आशा आहे. त्यामुळे या वर्षात लोकल प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading