ईद-ए-मिलाद साध्या पद्धतीने साजरा करण्याचे महापौर आणि महापालिका आयुक्तांचे आवाहन

यंदाचा ईद – ए – मिलाद साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केलं आहे. कोव्हीड-१९ मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ३० तारखेचा ईद – ए – मिलाद जुलूस साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून ठाणेकरांनी देखील ईद – ए – मिलाद घरीच राहून साध्या पद्धतीने साजरा करून मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले असून याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्य शासनातर्फे सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे ईद – ए – मिलाद मिरवणुकीला परवानगी देता येणार नसल्याने प्रतिकात्मक स्वरुपात खिलाफत हाऊस, मुंबई येथील मिरवणुकीला एका ट्रकसह १० व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रवचनाचा कार्यक्रम शासनाचे नियमांचे पालन करुन ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावा. त्याचे केबल टि.व्ही, फेसबुक इत्यादी माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे इतरांना पाहण्याची व्यवस्था करावी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहणार असून त्यामध्ये कोणतीही शिथीलता देण्यात येणार नाही. मिरवणुकीच्या दरम्यान स्वागतासाठी मंडप बांधावयाचे असल्यास नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक असून मंडपामध्ये एकावेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती असणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ईद – ए – मिलादनिमित्त मुस्लिम वस्तीत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणार्थ पाण्याची तात्पुरती पाणपोई लावण्याची परंपरा आहे. पाणपोई बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन त्या ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाहीत तसेच या ठिकाणी सीलबंद पाण्याच्या बाटलींचे वाटप करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच पाणपोईच्या ठिकाणी स्वच्छता राखावी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे अशा सूचना महापालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. मिरवणुकी दरम्यान रस्त्यावर पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये, शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन हा सण घरी राहून साधेपणाने साजरा करावा, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे असे उपक्रम राबवून या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत, पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करावे असे आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading