इस्त्रायलमधील विद्यार्थ्यांशी महापालिका आयुक्तांचा मुक्त संवाद

इस्त्रायलमधील आयडीसी हर्जलिया विद्यापीठाच्या तसंच मुंबईतील नामांकीत आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या जवळपास ३० विद्यार्थ्यांशी महापालिका आयुक्ता संजीव जयस्वाल यांनी मुक्त संवाद साधून शहरामध्ये राबवण्यात येणा-या महत्वाकांक्षी प्रकल्पांची त्याचबरोबर पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती दिली. ऑब्जर्व्हर रिसर्च फौंडेशनच्या वतीनं इस्त्रायलच्या आयडीसी हर्जलिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी नगर नियोजन या विषयावर ४ दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत इस्त्रायलमधील १५ विद्यार्थी तसंच मुंबईतील प्रतिथयश आर्किटेक्चर महाविद्यालयाचे १५ विद्यार्थी सहभागी झाले होते. मुंबईच्या तुलनेत डॉर्मेटरी शहर अशी ओळख असलेल्या या शहराची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची आवश्यकता होती. त्यासाठी मुलभूत पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच दळणवळण, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात महत्वाकांक्षी प्रकल्प राबवून या शहराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त करून देण्याचा प्रयत्न असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं. लोकशाहीमध्ये आजच्या घडीला नागरिकांना अभिप्रेत असलेल्या संकल्पनांची अंमलबजावणी करणं अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. ठाणे शहराच्या बदलत्या चेह-यावर आधारीत अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांचे सादरीकरण पालिका आयुक्तांनी यावेळी केले. इस्त्रायलचे वाणिज्य दूत एच. ई. कूव्हफ्रँकस्टीन यांनी शहराचा विकास ज्या पध्दतीनं होत आहे त्याबद्दल पालिका आयुक्तांचं कौतुक केलं. इस्त्रायल सरकार महापालिकेला सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही यावेळी दिली. यावेळी नागरी समूह विकास प्रकल्प तसंच इतर महत्वाच्या प्रकल्पांचं सादरीकरण करण्यात आलं. ठाणेकर असलेल्या प्रतिक शिरोडकर आणि त्याच्या सहका-यांनी अस्सल भारतीय रोबोटिकचे प्रात्यक्षिक दाखवलं. या संवादानंतर सर्व विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या विविध प्रकल्पांना भेटी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading