आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे, यासाठी मिलेट मेळा कार्यशाळेचे आयोजन

आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनच्या ठाणे कार्यालयाच्यावतीने आज बी.एन. बांदोडकर शास्त्र महाविद्यालयात वॉकेथॉन व मिलेट मेळा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या मेळ्यास भरघोस प्रतिसाद दिला. यावेळी आहार तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना तृणधान्याचे महत्त्व विशद केले. अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे जिल्हा कार्यालय आणि बी.एन. बांदोडकर शास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम बांदोडकर महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अन्न आणि औषध प्रशासनचे सहायक आयुक्त (अन्न) व्यंकटेश वेदफाटक, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. विंदा मंजुरामकर, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, ग्राहक मंचचे गजानन पाटील, जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहारतज्ज्ञ डॉ. शीतल नागरे, मिलेट तज्ज्ञ विनयकुमार आवटे, सहायक आयुक्त व्ही. एन. चव्हाण, सूर्यवंशी, व्यापारी संघटनेचे ताम्हाणे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वॉकेथॉनद्वारे मिलेट विषयी जनजागृती केली. आहार तज्ज्ञ डॉ. नागरे म्हणाल्या की, तरुणांनी सुदृढ राहण्यासाठी व्यायामाबरोबरच आहारामध्ये ज्वारी, बाजरी, भगर, राजगिरा अशा पौष्टिक खाद्याचा समावेश करावा. तसेच सकाळी भरपेट नाष्टा करावा, जेणेकरून दिवसभर शरीरात ऊर्जा निर्माण होईल. प्रक्रिया केलेले, जास्त तळलेले आणि कृत्रिम रंग टाकलेले अन्न टाळावे. मुलांना लहानपणापासूनच अन्न संस्कार रुजविण्याची आवश्यकता आहे. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.मंजुरामकर यांनी आहाराचे महत्त्व सांगितले. त्या म्हणाल्या की, आपण ज्या भू प्रदेशात राहतो, तेथे पिकणाऱ्या अन्न पदार्थांचाच आहारात उपयोग केला तर आरोग्य चांगले राहते. अनेकदा अन्न शिजवतानाच चुका होतात त्यामुळे ते अन्न पौष्टिक राहत नाही. सुदृढ आरोग्यासाठी विद्यार्थ्यांनी पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश करण्याचा संकल्प करावा. यावेळी पौष्टिक तृणधान्याच्या स्टॉलला महाविद्यालयातील शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती घेतली.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading