आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार दिवसात ठाणे महापालिकेची मालमत्ता करापोटी ८.७९ कोटींची कमाई

२०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार दिवसात ठाणे महापालिकेची मालमत्ता करापोटी ८ कोटी ७९ लाखांची कमाई झाली आहे. तर आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मालमत्ताधारकांना ऑनलाइन देयके उपलब्ध करून देणारी राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. १ एप्रिलच्या दिवशी पहाटे मालमत्ता कराची देयके तयार करून करदात्यांना त्यांच्या मोबाईलवर कर भरण्यासाठी महापालिकेकडून एसएमएस पाठवण्यात आला. नागरिकांनीही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्या चार दिवसात ८ हजार ७५५ मालमत्ताधारकांनी ८ कोटी ७९ लाख रुपये एवढ्या मालमत्ता कराचा ऑनलाईन पद्धतीने भरणा केला. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मालमत्ताधारकांना ऑनलाइन देयके आणि ती भरण्याची सुविधा प्रशासनाने उपलब्ध केली. अशी योजना महापालिकेच्या इतिहासात प्रथमच करण्यात आली. तसे करणारी ठाणे महापालिका ही राज्यातली पहिली महापालिका ठरली आहे.
ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागास यावर्षी ८०० कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहे. नवीन आर्थिक वर्षात या विभागाने पेपरलेस कारभारावर भर देण्याचे निश्चित केले आहे. या वर्षाचे बिल आणि बिल भरण्यासाठी उपलब्ध असलेल्या मार्गाची माहिती आतापर्यंत ३ लाख ४० हजार मालमत्ताधारकांना पाठवण्यात आली. यापूर्वी, मालमत्ता धारकांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत बिले पाठवली जात होती. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी देयक ऑनलाईन भरण्याची लिंक एसएमएसद्वारे उपलब्ध झाली. त्यामुळे त्याच दिवसापासून करदात्यांनी मालमत्ता कर भरण्यास सुरूवात केली. मालमत्ता कर भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नसल्याने नागरिकांनीही या योजनेस भरघोस सहकार्य केले. पहिल्या दिवशी १.९५ कोटी, दुसऱ्या दिवशी ३.०४ कोटी, तिसऱ्या दिवशी २.२० कोटी, चौथ्या दिवशी १.६० कोटी रुपयांच्या मालमत्ता कराचा भरणा झाला आहे. करदाते त्यांच्या देयकाची संगणकीय प्रत propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे अथवा प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रावरुन उपलब्ध करुन घेवू शकतील.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक / करदात्यांना मालमत्ता करसंलग्न सोयी- सुविधा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यामध्ये करदाते त्यांच्या घरातून अथवा कार्यालयातून अथवा इतर ठिकाणाहून मालमत्ता करसंलग्न सर्व सोयीसुविधा वापरू शकतील. आपल्या मालमत्तेवर किती कर प्रलंबित आहे, जर दंड लागू करण्यात आला असेल तर त्याची रक्कम किती आहे, मालमत्ता कर भरणा कोणकोणत्या पध्दतीने करता येईल, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे नागरिकांना महानगरपालिकेच्या वेबसाईटद्वारे घरच्या घरी मिळू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी महानगरपालिकेच्या कार्यालयात येण्याची व कोणास भेटण्याची गरज पडू नये अशा पध्दतीने प्रक्रिया सुलभ होईल याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading