आयुक्तांच्या कोपरी दौऱ्यामध्ये कंत्राटदारांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश

चेंदणी कोळीवा्ड्यातील वस्ती स्वच्छता गृह, तसेच विसर्जन घाट येथील सार्वजनिक शौचालय यांची देखरेख व स्वच्छता करण्यासाठी कोणीही उपस्थित नसणे, नळांना गळती लागून पाणी वाया जाणे, शौचकूपातील अस्वच्छता याबद्दल या दोन्ही शौचालयांच्या कंत्राटदारांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विविध विभागांचा आढावा बांगर यांनी घेतला. त्यानंतर, बुधवारी कोपरी ते आनंदनगर परिसरात प्रथमच त्यांनी दौरा केला. चेंदणी,
काेळीवाडा, हरियाली तलाव, अष्टविनायक चौक हा भाग त्यांनी पायी फिरून पाहिला. तसेच, कोपरी-मिठबंदर विसर्जन घाट, सॅटीस पुलाचे काम, कचऱ्यातून सापडलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचे संग्रहालय, कोपरी स्मशानभूमी, राम मराठे उद्यान, सिध्दार्थ नगर परिसर, कपडा मार्केट, ठाणे पूर्व स्टेशन परिसर, आनंदनगर प्रवेशद्वार, सेवा रस्ता, तीन हात नाका ते नितीन कंपनी येथेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी केली. प्रत्येक ठिकाणी तेथील स्थानिक प्रकल्प, स्वच्छता, रस्त्याचा कडेला असलेला कचरा आदींबद्दल त्यांनी नौपाडा परिमंडळाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी सूचना केल्या. कोळी वाडा वस्ती स्वच्छतागृहातील पाण्याची गळती, शौचकूप आणि व्हरांड्यातील अस्वच्छता, तसेच देखभाल करण्यासाठी कोणीच हजर नसणे, याबद्दल आयुक्त बांगर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हाच प्रकार, कोपरी-मीठबंदर विसर्जन घाटापाशी असलेल्या स्वच्छतागृहातही होता. या दोन्ही स्वच्छतागृहांच्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले. आपल्या शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयांची कोणतीही समस्या असेल तर ती प्राधान्याने दूर करावी. नागरिकांची गैरसोय अजिबात खपवून घेतली जाणार नाही, अशी ताकीद आयुक्तांनी दिली. ठाणे पूर्व येथील सॅटीस पुलाची बांगर यांनी दोन्ही दिशांनी पाहणी केली. कामाची सद्यस्थिती जाणून घेतल्यावर त्यांनी या कामाचे महिनावार नियोजन सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पुलाशेजारील नाल्यात साठलेला कचरा पाहून त्यांनी असमाधान व्यक्त केले. सॅटीससाठी सिद्धार्थ नगर येथे ठाणे महापालिकेने हटवलेल्या अतिक्रमणाची पाहणी करण्यात आली. तेथेच फुटपाथवर साठवण्यात आलेले कपड्यांचे गठ्ठे तत्काळ उचलण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले.
आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यात, कोपरीतील पराग सोसायटी आणि राम मराठे उद्यान येथे असताना एका ज्येष्ठ महिलेने थांबून एक समस्याही कानावर घातली. त्या म्हणाल्या या भागात मोठ्या संख्येने बाईकस्वार अत्यंत वेगात जातात. परिसरातील लहान मुले उद्यानात खेळण्यास येतात. त्यांना इजा होण्याची भीती आहे. त्यामुळे तेवढा गतीरोधक तातडीने द्यावा. आयुक्तांनी या सूचनेची आवश्यकता पडताळून पुढील कारवाई विनाविलंब करण्याचे आदेश दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading