जिल्ह्यात चार वर्षे काम करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे काम करण्याचे समाधान – माजी जिल्हाधिकाऱ्यांच्या भावना

ठाणे जिल्ह्यात गेली चार वर्षे काम करताना जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे अनेक कठीण प्रसंगावर मात करता आली, अश्या भावना ठाण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केल्या. नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाल्यानिमित्त जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा सन्मान आणि नवनियुक्त जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचा स्वागत सोहळा गडकरी रंगायतन येथे झाला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे वडील अंबादास शिनगारे यांचा नार्वेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महसूल प्रशासनाच्या वतीने नार्वेकर यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. नवनियुक्त जिल्हाधिकारी शिनगारे आणि श्रीमती शिनगारे आणि नार्वेकर आणि श्रीमती नार्वेकर यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. नार्वेकर म्हणाले की, जिल्हाधिकारी म्हणून काम करताना अनेक चांगल्या वाईट प्रसंग आले. परंतु जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या कर्तव्य पारायणता, नि:स्वार्थी भावनेने केलेल्या कामामुळे त्यावर मात करता आली. महालक्ष्मी एक्सप्रेसवरील आपत्ती, कोविड काळातील प्रसंग किंवा निवडणूक काळात केलेले काम असो या सर्व काळात सहकाऱ्यांनी केलेल्या कामामुळे जिल्ह्याचे नाव राखले गेले आहे. कोविड काळात ठाणे जिल्हा प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी यांच्या उत्तम काम आणि मेहनतीमुळे रेमडेसीविर वाटप किंवा मजुरांना रेल्वेने मूळ गावी पाठविण्यासाठी केलेले नियोजनाचा पॅटर्न देशभर पोचला, असेही नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. नवनियुक्त जिल्हाधिकारी शिनगारे म्हणाले की, राजेश नार्वेकर यांच्या सारख्या सक्षम नेतृत्वामुळेच कोविड काळातही ठाणे जिल्ह्याने उत्कृष्ट कार्य करून अग्रभागी राहिला. मुंबई च्या जवळ असलेल्या ठाणे जिल्ह्यात काम करण्याचे मोठे आव्हान नार्वेकर यांनी आपल्या शांत, सुस्वभावी, निग्रही आणि संयमी स्वभावाने लिलया पेलले आहे. त्यांनी आपल्या कृतीतून आव्हानांना उत्तर दिले. जिल्हाधिकारी पदाची विश्वासहर्ता वाढविण्याचे काम त्यांनी केले. सुमारे साडेचार चाललेल्या या कार्यक्रमात जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नार्वेकर आणि शिनगारे यांच्या विषयीच्या आपल्या भावना भरभरून व्यक्त केल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading