आनंद नगर नाक्यावर टोलमुक्ती कराच – संजय केळकर

ठाणे पासिंग असलेल्या वाहनांना आनंद नगर नाक्यावर टोलमुक्त करण्यासाठी आमदार संजय केळकर गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. संबंधित मंत्र्यांनी सकारात्मक भूमिकाही घेतली होती. सध्या या मुद्द्यावर आंदोलने सुरू असून टोलमुक्ती कराच, अशी आग्रही मागणी केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेला ठाण्यातील आनंद नगर टोल नाका एमएच ०४ वाहनांसाठी डोकेदुखी ठरलेली आहे. रोज हजारो गाड्या या नाक्यावरून मुंबईत प्रवेश करतात आणि मुंबईकडून ठाण्यात येत असतात. टोल भरण्यासाठी या वाहनांना काही काळ थांबावे लागत असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडीही होत असते. त्यामुळे पैसे आणि इंधन याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत असतो. टप्प्या टप्प्याने टोल मुक्ती करताना एमएच ०४ वाहनांना मुंबईत प्रवेश करताना टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी केळकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. याबाबत पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. या मार्गावरील टोल बंद करताना ठेकेदार कंपनीला किती भरपाई द्यावी लागेल, याचा आढावा घेण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. तीन वर्षात वाहनांच्या संख्येत मोठी भर पडली असून आनंद नगर नाक्यावरून पूर्वीपेक्षा तिपटीने वाहने ये-जा करत आहेत. त्यामुळे ठेकेदार कंपनीची वसुली जवळपास पूर्ण झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या हा टोल नाका टोलमुक्त करण्यासाठी आंदोलनेही होत आहेत. या पार्श्वभूमीवर एम एच ०४ वाहने टोलमुक्त कराच, अशी आग्रहाची मागणी आमदार केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading