आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या उपक्रमांच्या उद्घाटन

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून हे वर्ष घोषित करण्यात आले आहे. एक प्रकारे त्यातून आपल्याला आपल्या मूळ आहार पद्धतीकडे जाण्याचाच मार्ग खुला झाला आहे. तृणधान्यांचे योग्य प्रमाणात आहारात सेवन केल्यास त्यातून शरीराला उर्जा मिळेल. त्यामुळे संयम, सकारात्मकता आणि प्रसन्नता वाढेल, अशी मांडणी डॉ. उदय आणि डॉ. मधुरा कुलकर्णी यांनी तृणधान्याचे फायदे सांगताना केली. निमित्त होते ठाणे महापालिकेतर्फे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या उपक्रमांच्या उद्घाटनाचे. केंद्र आणि राज्य सरकारतर्फे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने निरनिराळे उपक्रम हाती घेतले आहेत. महापालिकेने त्याच जोडीने तृणधान्य वापराच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी व्यापक मोहीम आखली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तृणधान्यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी, या व्याख्यानाद्वारे आयुर्वेद शास्त्रातील तज्ज्ञ डॉ. उदय कुलकर्णी आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. मधुरा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. वाढते आजार, स्थूलता आदींवर मात करणे त्यांचा प्रभाव रोखणे यासाठी तृणधान्य वापरण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे डॉ. मधुरा कुलकर्णी यांनी सांगितले. तृणधान्यांची निवड, त्याचा वापर, त्यातून तयार होणाऱ्या विविध पाककृती, त्याचे सेवन करण्याचे साधे नियम आदींबाबत त्यांनी विस्तृत माहिती दिली. हळूहळू आहारात तृणधान्याचे प्रमाण वाढवत न्यावे, त्यातून आपण आरोग्यपथावर पुन्हा येऊ. आपल्या शरीराला उर्जा मिळाल्याने त्याचे सकारात्मक फायदे दिसू लागतील, असेही डॉ. मधुरा यांनी स्पष्ट केले. तर, पुढील १५ दिवस आपण स्वत: तृणधान्याचा हळूहळू वापर करून आपल्याला काय फरक जाणवतो तो वहीत नोंदवून ठेवा. या धान्याबद्दल आपली खात्री झाली की मग त्याचा वेगाने प्रचार आणि प्रसार करण्याचे बळ मिळेल, असे डॉ. उदय कुलकर्णी यांनी सांगीतले. तृणधान्यांची शास्त्रीय माहिती, त्याची वेगवेगळ्या प्रांतातील नावे, ज्वारी, बाजरी, भगर, वरी आदीचा आपण करत असलेला वापर याबद्दल डॉ. उदय यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading