अयोध्येतील राम मंदिरासाठी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ५ लाखांची देणगी दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. त्यानंतर मंदिर उभारणीसाठी १० अब्ज रूपये उभारण्याचा निर्धार विश्व हिंदू परिषदेनं व्यक्त केला होता. यासाठी निधी उभारणीही सुरू झाली होती. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी या राम मंदिर उभारणीसाठी ५ लाखांचा निधी दिला आहे. डोंबिवलीतील गणेश मंदिराचे विश्वस्त मधुकर चक्रदेव यांच्याकडे श्रीकांत शिंदे यांनी ५ लाखांचा धनादेश सुपुर्द केला. राम मंदिर उभारणीच्या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचं भाग्य प्राप्त झाले अशी भावनिक प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे.