अनधिकृत बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांवर ‘मोक्का’ कारवाई करण्याची प्रवीण दरेकरांची मागणी

घोलाईनगर येथील दरड दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर मोक्कान्वये कारवाई करावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. मुंबई-ठाण्यातील चार घटनांबाबत गांभीर्याने दखल घेऊन, छोट्या अधिकाऱ्यांवर कारवाई न करण्याऐवजी जबाबदार अधिकाऱ्यांवरच कारवाई करावी असे दरेकर म्हणाले. घोलाईनगर येथे दरड कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील जखमींना छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींची दरेकर यांनी विचारपूस केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुंबई-ठाण्यातील चार घटना डोळ्यात अंजन घालणाऱ्या आहेत. शासकिय यंत्रणांना हाताशी धरून भूमाफियांनी अनधिकृत बांधकामे केली. त्यात गरीबीमुळे राहणाऱ्या नागरिकांवर आपत्ती कोसळली. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांच्या काळात ही अनधिकृत बांधकामे झाली, त्यांच्यावर मोक्का नुसार कारवाई व्हावी. कोणत्याही छोट्या पदावरील अधिकाऱ्यांपेक्षा महापालिका आयुक्त वा तत्सम अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यास अशी प्रवृत्ती ठेचता येईल. मुंबई-ठाण्यात २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून एसआरए योजना लागू करण्यात आली. मात्र, शिवसेनेने विकासाला मुठमाती देत अनधिकृत बांधकामांना पाठबळ दिले. त्यामुळे त्याचा फटका बसत आहे, अशी टीका दरेकर यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी राज्याची गाडी चालविण्याची गरज आहे. मातोश्री ते मंत्रालयापर्यंत ते गाडीने जात नाहीत. मात्र, ते आता पंढरपूरपर्यंत गाडी चालवित गेल्यामुळे अप्रूप वाटत आहे. राज्याचा गाडा विस्कळित झाला असून, मुख्यमंत्री हे राज्याचे ड्रायव्हर आहेत. त्यामुळे त्यांनी राज्याची गाडी चालवावी, असा टोला प्रवीण दरेकर यांनी मारला. घोलाईनगर येथील दुर्घटनेनंतर बेघर झालेल्या कुटुंबांना महापालिकेने आठवडाभरात तात्पुरत्या स्वरुपात घर उपलब्ध करून द्यावे. त्याचबरोबर लकी कंपाऊंडच्या धर्तीवर घोलाईनगर दुर्घटनेप्रकरणी चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे यावेळी आयुक्तांकडे करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading