भारतीय चलनातून रद्द करण्यात आलेल्या ५०० रूपयांच्या ८२ हजार रूपयांच्या नोटा आणिवेगवेगळ्या कंपन्यांच्या १४ मोबाईल फोनसह एका आरोपीला मुंब्रा पोलीसांनी अटक केली आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून पोलीस आयुक्तांना एक व्यक्ती भारतीय चलनातील बनावट नोटा घेऊन अमृतनगर या परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड आणि त्यांच्या पथकानं जसीम उर्फ वसीम सलीम शेख याला अमृतनगर येथील राहत्या घरातून ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे भारतीय चलनातून रद्द करण्यात आलेल्या ५०० रूपयांच्या १६४ बनावट नोटा, ६४ हजार रूपयांचे वेगवेगळ्या १४ कंपन्यांचे मोबाईल फोन मिळाले. मुंब्रा पोलीसांनी याप्रकरणी जसीम शेखला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.