स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अभियानात ठाणे महापालिकेचा क्रमांक बराच घसरला

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अभियानात ठाणे महापालिकेचा क्रमांक गेल्यावर्षीच्या तुलनेत बराच घसरला आहे. गेल्यावर्षी स्वच्छ शहरांच्या यादीत ठाणे महापालिकेचा क्रमांक ४० होता तर यंदा मात्र तो ५७ पर्यंत खाली घसरला आहे. ठाणे महापालिका घनकचरा व्यवस्थापनासाठी मोठमोठे प्रकल्प उभारण्याच्या घोषणा करत असताना दुसरीकडे मात्र स्वच्छ शहराच्या यादीतील क्रमांक घसरला आहे. ठाणे महापालिकेनं मोठ्या गृहसंकुलांनी त्यांच्याकडे निर्माण होणा-या कच-याची विल्हेवाट स्वत: लावावी यासाठी प्रयत्न केला होता. मात्र या योजनेला गृहसंकुलांकडून फारसा पाठिंबा मिळाला नाही. त्यातच रोज जमा होणा-या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी डंपिंग ग्राऊंड नसल्यामुळं पालिका कच-याची विल्हेवाट न लावता कचरा फक्त जमा करत असल्याचं दिसत आहे. जिल्ह्यातील इतर नगरपालिका आणि महापालिकांनी मात्र केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात काहीशी बाजी मारली आहे. कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, भिवंडी, अंबरनाथ-बदलापूर या शहरांनी चांगली कामगिरी करत या यादीत आपलं स्थान वर नेण्यात यश मिळवलं आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका २३७ वरून ७७ वर आली आहे. मीरा-भाईंदर महापालिकेनं गेल्यावर्षीच्या ४७व्या क्रमांकावरून यंदा २७वं स्थान मिळवलं आहे. अंबरनाथ नगर परिषद ६७ क्रमांकावरून ३७ व्या क्रमांकावर आली आहे. कुळगाव-बदलापूर पालिकेनंही गेल्यावर्षीच्या ८९व्या क्रमांकावरून ३८व्या क्रमांकावर उडी घेतली आहे. त्या तुलनेत ठाणे महापालिकेचा क्रमांक मात्र घसरला असून स्वच्छ शहरासाठी कोट्यावधीचा निधी खर्चूनही कच-याची शास्त्रोक्त पध्दतीनं विल्हेवाट लावण्यात पालिकेला अपयश आलं आहे. त्यामुळंच महापालिकेचा क्रमांक घसरला आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: