शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांच्या बुलेट ट्रेनच्या भूमिके विरोधात ठाण्यातील शिवसैनिकांची भूमिका – राष्ट्रवादीचा आरोप

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र त्यांचे ठाण्यातील शिलेदार याच बुलेट ट्रेनसाठी दिवा पंचक्रोशीतील नागरी सुविधांसाठी आरक्षित असलेल्या भुखंडांवरील आरक्षण उठवण्याचा ठराव मांडत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे ठाण्याची शिवसेना आपल्या पक्षप्रमुखांचे म्हणणे झुगारत असल्याचेच दिसून येत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. ठाणे शहराच्या हिताचे प्रश्न महासभेमध्ये आम्ही मांडण्याचा  प्रयत्न केल्यास बहुमताच्या जोरावर ते फेटाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापौर तरी जनहितासाठी असे प्रश्न मांडण्याची मुभा देतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना देखील जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. अनेकदा विरोधी पक्षांकडून मांडण्यात आलेल्या लक्षवेधी फेटाळून लावण्याचा प्रकार घडला आहे. तरीही सध्या शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सखोल चर्चा व्हावी या उद्देशाने आपण आणि सुहास देसाई यांनी पाण्याच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली आहे. त्यावर महापौरांनी चर्चा घडवून आणावी अशी आमची अपेक्षा आहे. विशेष, म्हणजे, न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र आणि गोषवार्‍यातील पाण्यासंदर्भातील माहिती यामध्येही घोळ असल्याचा आरोपही मिलिंद पाटील यांनी यावेळी केला. ठाण्याच्या समस्यांवर चर्चा करण्यापेक्षा समस्या बघून पळ काढण्याचे धोरण सत्ताधारी शिवसेनेचे आहे. ठाणेकरांना सध्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एप्रिल-मे मध्ये ही समस्या अधिकाधिक तीव्र होणार असल्याने मिलिंद पाटील आणि सुहास देसाई यांनी ही लक्षवेधी मांडली आहे. सत्ताधार्‍यांनी किमान ठाणेकरांच्या हितासाठी त्यावर चर्चा करावी असे आनंद परांजपे यांनी सांगितले.

Leave a Comment

%d bloggers like this: