नव्या ठाण्याला विरोध असतानाही गोंधळामध्ये सत्ताधारी शिवसेनेकडून नव्या ठाण्याचा प्रस्ताव मंजूर

ठाणे खाडी पलिकडे नवीन ठाणे वसवण्याच्या प्रस्तावास विरोध असतानाही सत्ताधारी शिवसेनेनं अभूतपूर्व गोंधळात याबाबतचा प्रस्ताव काल झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला. नवीन ठाणे वसवण्याच्या कल्पनेस शिवसेना वगळता सर्वांचा विरोध असतानाही कालच्या सर्वसाधारण सभेत याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर या गावांचा नवीन ठाण्यात समावेश आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला किंवा नामंजूर झाला तरीही या भागाचा विकास होणारच आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेचा निधी खर्च करावा लागणार नसून या योजनेत सहभागी झाल्यास ठाण्याचं नाव होईल असं सांगत पालिका आयुक्तांनी या प्रस्तावाचं समर्थन केलं. मात्र तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षानं विविध शंका उपस्थित करत या शंकांचं निरसन झाल्यावर या प्रस्तावावर निर्णय घेण्याची मागणी केली. सभेची वेळ संपत आल्यामुळं हा प्रस्ताव तहकूब करण्याची मागणी केली. मात्र यावरून झालेल्या गोंधळात शिवसेनेनं हा प्रस्ताव मंजूर करून घेतला.

Leave a Comment

%d bloggers like this: