थीम पार्क चौकशी निव्वळ फार्स – मिलिंद पाटील

थीम पार्कच्या उभारणीतील ठेकेदार नितीन देसाई हे सत्ताधा-यांबरोबर फिरत असल्यानं चौकशीचा निव्वळ फार्स सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला आहे. मोठा गाजावाजा करत घोडबंदर परिसरात उभारण्यात आलेल्या थीम पार्क प्रकल्पातील कंत्राटी कामाचे धिंदवडे निघाले आहेत. या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसनंच उघडकीस आणलं होतं. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसनंच केली होती. राणा भीमदेवी थाटात चौकशीची घोषणा करणारे सत्ताधारीच ठराव करण्यास वेळकाढूपणा करत आहेत. विरोधी पक्षनेत्यांच्या सही अभावी हा ठराव रेंगाळला असल्याचं सांगितलं जात असलं तरी शनिवारी तयार केलेला ठराव तात्काळ पाठवणं गरजेचं असताना सभागृह नेत्यांनी तो सायंकाळी उशिरा पाठवला. त्यावेळी आपण कार्यालयात नसल्यानं स्वाक्षरी होऊ शकली नाही. मात्र आता त्याचा बाऊ केला जात असल्याचं मिलिंद पाटील यांचं म्हणणं आहे. सत्ताधारी पक्षालाच या प्रकरणी चौकशीची गरज नाही. या पार्कचे ठेकेदार नितीन देसाई पालकमंत्र्यांसोबत फिरत आहेत. यावरून या प्रकरणाची चौकशी करण्याचा केवळ फार्स करत असल्याचं दिसून येत असल्याचा टोला मिलिंद पाटील यांनी लगावला आहे. या प्रकल्पातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी ४८ तासात समिती नेमली जाईल अशी घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात आठवडा उलटूनही समिती स्थापन झालेली नाही. समिती स्थापन झाल्यास सत्ताधा-यांचा भ्रष्टाचार उघडकीस येणार असल्याचा दावा मिलिंद पाटील यांनी केला आहे.

 

 

Leave a Comment

%d bloggers like this: