ठाण्यातील वारकरी भवनाचा अखेर ८ वर्षानंतर वारक-यांना ताबा

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिपूजन केलेल्या ठाण्यातील वारकरी भवनासाठी शेकडो वारकरी काल ठाणे महापालिका मुख्यालयावर धडकले.टाळ-मृदुंगासह हरीनामाचा जयघोष करीत वारकऱ्यांसाठी बांधण्यात आलेले वारकरी भवन तब्बल 8 वर्षानंतर पुन्हा ताब्यात मिळवले. यावेळी खासदार राजन विचारे, नाट्य परिषदेचे विद्याधर ठाणेकर, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी दिनकर पाचंगे आणि अनेक जेष्ठ नागरिक, वारकरी मंडळे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कलावंत उपस्थित होते. दरम्यान निवडणुका जवळ आल्यानेच इतक्या वर्षांनंतर शिवसेनेला वारकऱ्यांची आठवण झाल्याची टीका होत आहे. ठाण्यातील घंटाळी परिसरात असलेल्या वारकरी भवनाचे भूमिपूजन 2007 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. ही वास्तू 2010 साली उभारल्यानंतर 2011 साली या वास्तूचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. तरीही ही वास्तू वारकरी संप्रदायाकडे हस्तांतरीत केली नव्हती. त्यानंतर 2016 साली महापालिकेने एक ठराव पास केला होता. त्यात स्पष्ट उल्लेख केला होता की या वास्तूचा पाहिला मजला ज्येष्ठ नागरिकांसाठी, दुसरा मजला संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज वारकरी संघ यांच्यासाठी आणि तिसरा मजला अखिल भारतीय नाट्यसंमेलन ठाणे शाखेसाठी राखीव ठेवण्यात आला होता. ठराव संमत होऊनही या संस्थांना त्या वास्तूचा ताबा दिला गेला नाही. त्या ठरावालाही आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. 2017 साली ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाची इमारत धोकादायक झाल्या कारणास्तव वारकरी भवनाची ईमारत ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने वापरण्यास मिळावी अशी मागणी केली होती. महापालिकेमध्ये न्यायालयाला ही वास्तू तात्पुरत्या वेळेसाठी देण्यात यावी. यासाठी ठराव मंजूर झाल्यानंतर ठरावाचा कालावधी पूर्ण होऊन एक वर्ष सहा महिने झाले तरीही न्यायालयाने ही वास्तू वापरात घेतली नाही. वारंवार वारकऱ्यांनी आयुक्तांकडे वारकरी भवनाची मागणी केली असता त्यांना तारखांव्यतिरिक्त काहीही मिळाले नाही. दरम्यान खासरादर राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली जेष्ठ नागरिक संघ, वारकरी संप्रदायाचे शिष्टमंडळ आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कलावंत पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना भेटले. त्यानुसार आयुक्तांनी लेखी स्वरुपातील पत्र सर्व संस्थाना देवून हा विश्वास दर्शवला की न्यायालयाकडून ही इमारत मिळताच आपल्या संस्थांकडे सुपूर्द केली जाईल.

Leave a Comment

%d bloggers like this: