टोईंगच्या नावाखाली बनावट पावत्या फाडणा-या टोळीला मारहाण करणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेले अनेक दिवस आनंदनगर जकात नाक्याजवळ रात्री २ च्या सुमारास राज्याबाहेरील गाड्या अडवून एक टोळी जबरदस्तीने बनावट पावत्या फाडण्याचं काम करत होती. लाठ्याकाठ्यांचा धाक दाखवून या टोळीकडून असा प्रकार सुरू होता. याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर वाहतूक पोलीसांना या प्रकाराबद्दल त्यांनी जाब विचारला. त्यावेळी वाहतूक पोलीसांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. तर टोईंग टोळीनं दादागिरीची भाषा सुरू केली. त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी या टोळीतील मंडळींना बेदम चोप दिला. या कार्यकर्त्यांवर क्रेन चालकासह वाहतूक पोलीसांना मारहाण केल्याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. रस्त्यावर बिघाड झालेल्या वाहनाच्या मदतीसाठी गेलेल्या वाहतूक पोलीसांच्या क्रेनवरील अब्दुल सय्यदसह वाहतूक कर्मचा-यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी क्रेनचालक अब्दुल सय्यद यांनी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्याला झालेल्या मारहाणीत त्याचा एक दातही पडला आहे. पोलीसांनी कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत.
