कळवा-मुंब्रा मेट्रोचा विस्तृत प्रकल्प अहवाल येत्या सर्वसाधारण सभेत सादर न केल्यास सर्वसाधारण सभा उधळून लावण्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हांडानी दिला आहे. आज एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला. ठाण्याच्या बरोबरीने कळवा-मुंब्र्यामध्येही मेट्रो रेल्वे सुरू करावी अशी आमची मागणी आहे. मात्र पाचव्या टप्प्यामध्ये कळवा-मुंब्रा भागात मेट्रोचं काम सुरू केलं जाईल असं सांगितलं जात आहे. यांच्या फेजच्या नादात आमच्या तोंडाला फेस आणला जात आहे. त्यामुळं आता ही सापत्न वागणूक सहन करणार नाही. जर येत्या १९ जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत कळवा-मुंब्रा मेट्रोचा डीपीआर म्हणजे विस्तृत प्रकल्प अहवाल सादर झाला नाही तर ही सभा उधळून लावण्याचा इशारा आव्हाडांनी दिला आहे. कळवा-मुंब्रा, दिवा, शीळ, म्हातर्डी, दातिवली अशा २४ गावांना गेली २५ वर्ष वा-यावर सोडलं आहे. ठाण्यात अंतर्गत मेट्रोसह अनेक सुविधा दिल्या जात असतील तर कळवा-मुंब्रा हे काय सावत्र आहेत का असा प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. मेट्रो रेल्वेच्या बाबतीत कळवा-मुंब्रावासियांच्या तोंडाला पानं पुसली जात असून ठाण्याच्या मेट्रोचा नारळ जेव्हा फुटेल तेव्हाच मुंब्रा मेट्रोचा नारळ फुटला पाहिजे यासाठी आगामी सर्वसाधारण सभेत प्रकल्प अहवाल सादर करून आश्वासित करावे अन्यथा सर्वसाधारण सभा चालू दिली जाणार नाही असा इशाराच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
