आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर भूमीपुत्र नाराज

शिवसेना आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर भूमीपुत्र नाराज झाले आहेत. याला कारण ठरलं आहे ठाण्यातील विविध योजना आणि उत्तरभारतीयांच्या छठ पूजेसाठी तयार केले जात असलेले तीन घाट. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भूमिपुत्रांचा रेती व्यवसाय टिकवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. मात्र त्याच खाडीवर उत्तरभारतीयांच्या छठ पूजेसाठी तीन घाट बनवण्याचं आश्वासन देऊन त्यांनी भूमिपुत्रांचा अपमान केल्याचं मत सागर पाटील यांनी व्यक्त केलं आहे. प्रताप सरनाईक यांनी ६ वर्षापूर्वी आगरी-कोळी समाज भवन एका वर्षात बनवण्याचं आश्वासन दिलं होतं. पण जागा मंजूर करण्यापलिकडे काही झालं नाही. मात्र उत्तरभारतीयांसाठी घाट तयार होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून भूमिपुत्रांमध्ये याबाबत रोष असल्याचं प्रितेश पाटील यांनी सांगितलं. समूह विकास योजनेला विरोधासाठी झालेल्या एकाही सभेला प्रताप सरनाईक उपस्थित राहिले नाहीत. मात्र दुसरीकडे गावठाण, कोळीवाड्यांना समूह विकास योजनेतून वगळण्याचं श्रेय घेण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी बॅनरबाजी करून भूमिपुत्रांचा रोष ओढवून घेतला आहे. भूमिपुत्रांचा हा रोष फक्त आमदारांवर नसून महापालिकेच्या सत्ताधा-यांवर सुध्दा आहे. मेट्रो कास्टींग यार्ड, मेट्रो वर्कशॉप, खाडीतून पाणी शुध्द करण्याचा प्रकल्प अशा विविध प्रकल्पांचा भूमिपुत्रांना काहीच फायदा नसून यामुळं भूमिपुत्र भूमिहिन होणार असल्यामुळं भूमिपुत्रांमध्ये याबाबत रोष असल्याचं सांगितलं जातं.

Leave a Comment

%d bloggers like this: