घोडबंदर परिसरात काही दिवसापूर्वी सापडलेल्या बिबळ्याच्या बछड्याला आमदार प्रताप सरनाईक दत्तक घेणार आहेत. येऊर येथे काही दिवसांपूर्वी एक बिबळ्याचा बछडा आढळला होता. सकाळी फिरायला येणा-या मंडळींना तो दिसल्यानंतर काहींनी ही बाब वन विभागाला कळवली आणि आईविना असलेल्या बिबळ्याला वन विभागानं आपल्या ताब्यात घेतलं. वन विभागातर्फे या बिबळ्याच्या आईशी भेट घडवण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण ते अयशस्वी ठरले. त्यामुळं सध्या वन विभागातर्फे आईपासून हरवलेल्या या बिबळ्याच्या बछड्याचा सांभाळ केला जात आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात त्याचा सांभाळ होत असून आता त्याच्या पुढील आयुष्याचा खर्च आमदार प्रताप सरनाईक करणार आहेत. प्रताप सरनाईक यांच्या चिरंजीवाचा उद्या वाढदिवस असून या वाढदिवसाचं औचित्य साधून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दत्तक योजनेअंतर्गत या बिबळ्याच्या बछड्याला दत्तक घेतलं जाणार आहे.